पहिल्या प्रयत्नातील चुका सुधारून "त्याने' रोवला "यूपीएससी'त झेंडा

अमोल जाधव
Saturday, 8 August 2020

मनात जिद्द पक्की असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते, असा विश्वास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 481 व्या क्रमांकाने यश मिळणाऱ्या काले (ता. कऱ्हाड) येथील ऋषिकेश जयसिंग देसाई याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 
 

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : स्वतःमधील जिद्द, जिज्ञासा व चिकाटी या त्रिसूत्रीचा आधार घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या एकापेक्षा कमी गुणाने यश हुकले. दुसऱ्या प्रयत्नावेळी अभ्यासातील पूर्वीच्या चुका सुधारत यश खेचून आणण्याचा निर्धार केला आणि मला यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. मनात जिद्द पक्की असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते, असा विश्वास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 481 व्या क्रमांकाने यश मिळणाऱ्या काले (ता. कऱ्हाड) येथील ऋषिकेश जयसिंग देसाई याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

ऋषिकेशच्या वडिलांचे काले येथे कापड दुकान आहे, तर आई सुरेखा या गृहिणी आहेत. काले येथे देसाई बंधूंचे 12 सदस्यांचे एकत्र कुटुंब आहे. ऋषिकेशचे वडील व आई घरातील मुलांच्या शिक्षणासाठी 25 वर्षांपासून कऱ्हाडजवळील कोयना वसाहतीत स्थायिक आहेत. ऋषिकेशची बहीण व भावंडे पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. ऋषिकेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समधून पूर्ण केल्यानंतर त्याने पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओइपी) येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याआधी त्याच्या मनात स्पर्धा परीक्षेचे आकर्षण होते. पदवी करत असताना स्पर्धा परीक्षेतील रस अधिकच वाढला. पदवीच्या शेवटच्या वर्षात कॅम्पस प्लेसमेंटसाठी न बसता स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण झाले. 2018 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या एकापेक्षाही कमी गुणाने यश हुकले. 

दुसऱ्या प्रयत्नावेळी पूर्व, मुख्य व मुलाखत या तिन्ही पातळ्यांवर यश मिळवायचेच, ही मनाशी खूणगाठ बांधून अभ्यास सुरू केला. त्यासाठी पूर्वीच्या अभ्यासातील चुका सुधारत वाढलेला अनुभव बरोबर घेऊन प्रयत्न केला. अखेर जिद्द, जिज्ञासा व चिकाटीमुळे हे यश मिळाले. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या अभ्यासिकेत सकाळी नऊ ते रात्री 11 पर्यंत थांबून अभ्यास केला. यावेळेत जेवण व विश्रांतीसाठीचा वेळ वगळता उर्वरित वेळेत मन लावून अभ्यास केला. आई, वडील व कुटुंबातील सर्वांच्या प्रेरणेमुळे मला हे यश मिळाले, असेही त्याने सांगितले. 

ऋषिकेशला दहावीच्या परीक्षेत 97, तर बारावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळाले आहेत. बारावीच्या परीक्षेत तो जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल रिलायन्स फाउंडेशनने नीता अंबानी यांच्या हस्ते त्याचा गौरव करत शिष्यवृत्ती दिलेली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्याचा गौरव केला आहे. तबला, पोहणे व व्यायाम हे छंदही त्याने उत्तमपणे जोपासले आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Succeeded In UPSC By Correcting Mistakes In The First Attempt