Satara : बैलगाडीची ऊस वाहतूक संकटात

लम्पी चर्मरोगाच्या आजाराने तोंड वर काढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
बैलगाडी
बैलगाडीsakal

कऱ्हाड : लम्पी चर्मरोगाच्या आजाराने तोंड वर काढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. जनावरांत माशांपासून हा आजार पसरत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. मात्र, या आजाराची धास्ती साखर कारखानदारांनीही घेतली आहे. साखर कारखान्यांकडे गळितास येणारा ४० टक्के ऊस हा बैलगाड्यांमार्फत आणला जातो. त्यामुळे यंदाचा हंगाम तोंडावर असताना लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बैलगाडीद्वारे होणारी ऊस वाहतूक संकटात सापडली आहे. त्यामुळे साखर कारखानदार धास्तावले आहेत. त्यावर पर्याय काढायचा काय? या विवंचनेत कारखानदार आहेत.

उसाला आवश्यक पर्जन्यमान होत असल्याने उसाच्या सरासरी उत्पादनातही वाढ होत आहे. राज्यात २०११ - १२ मध्ये ७.५६ लाख हेक्टर उसाची लागवड झाली. २०१४- १५ मध्ये १०.५४ लाख हेक्टरवर पोचली. नंतर दुष्काळाचा फटका बसल्याने २०१६- १७ मध्ये ऊस लागवड ६.३३ लाख हेक्टरपर्यंत खाली आली. गेल्या चार वर्षांपासून ऊसलागवडीत वाढ होत आहे. २०२०-२१ मध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र ११.४२ लाख हेक्टरवर पोचले. कारखान्यांना ऊसतोडणी यंत्रणा, वाहतुकीची व्यवस्था आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही.

त्यामुळे साखर कारखान्यांपुढे जादा उसाचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडात राळे वाळण्याची वेळ आली, तरीही काही भागांत उसाला लवकर तोड मिळत नाही. त्यामुळे साखर कारखान्यांच्या लगतच्या अंतरातील ऊस हा बैलगाडीद्वारे आणून त्याचे गाळप केले जाते. बैलगाड्यांद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून उसाची वाहतूक केली जाते. साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होताच प्रत्येक गावांच्या वेशीवर पहाटे- पहाटे बैलगाड्या दिसतात. बैलांची दुडकी चाल, घुंगरांचा आवाज यामुळे त्या लक्षवेधी ठरतात. राज्यात २४६ साखर कारखाने आहेत. त्यामध्ये मागील वर्षीच्या हंगामात १९० साखर कारखान्यांच्या चिमण्या पेटून उत्पादन घेण्यात आले. त्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या ९५ होती.

खासगी साखर कारखानेही सहकारी साखर कारखान्यांच्या बरोबरीने म्हणजेच ९५ होते. राज्यात बंद असलेल्या साखर कारखान्यांची संख्या ५६ आहे. ऊसतोडणीसाठी विदर्भ, मराठवाडा, उस्मानाबाद, सोलापूर, कर्नाटकातून मजूर कुटुंबासह कारखाना परिसरात येतात. ते मजूर बैलाबरोबरचं इतरही जनावरे सांभाळतात. त्यामुळे ते मजूर संबंधित जनावरांसह या भागात येतात. त्यांच्यामार्फत कारखान्यांना

ऊसपुरवठा केला जातो. यंदाचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम पुढील महिन्यापासून सुरू करण्यासाठीच्या हालचाली साखर आयुक्तालयाकडून सुरू आहेत. साखर कारखान्यांच्या हंगामासाठी ऊसतोडणी, वाहतुकीची यंत्रणा सज्ज करण्यासाठी कारखान्यांकडून कार्यवाही सुरू आहे. गळीत हंगाम तोंडावर असतानाच लम्पी चर्मरोगाचा जनावरांना प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या आजाराने जनावरे दगावत असल्याने जनावरे सांभाळणारे शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जनावरांची खरेदी-विक्री, त्यांचे बाजार, जत्रा - यात्रातील प्रदर्शने यावर बंदी घातली आहे. असे असताना साखर कारखान्यांकडे ऊसतोडणीसाठी बैलांसह जनावरे घेऊन येणाऱ्या मजुरांपुढे यक्ष प्रश्न उभा आहे.

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...

लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांची वाहतूक राज्य सरकारने बंद केली आहे. त्याचा प्रादुर्भाव वाढल्याने साखर कारखानदारांनी बैलगाड्यांद्वारे ऊस वाहतुकीवर राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता बैलगाडीद्वारे होणाऱ्या ऊस वाहतुकीसंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे कारखानदार, ऊसतोड मजुरांचे लक्ष आहे.

यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याची तयारी सुरू आहे. बैलगाडीद्वारे राज्यातील साखर कारखान्यांना ४० टक्के ऊस वाहतूक केली जाते. ऊस वाहतुकीसाठी आणण्यात येणारी जनावरे लसीकरण करून आणल्यास लम्पीचा प्रादुर्भाव वाढणार नाही. मात्र जत, आटपाडी भागातील मजूर खिलार बैल, गाईंची जोपासना करतात. बैलगाडीबरोबर ते जनावरांनाही सोबत घेऊन येतात. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सरसकट सर्वच जनावरांचे लसीकरण करावे.

- आमदार बाळासाहेब पाटील, माजी सहकारमंत्री, अध्यक्ष, सह्याद्री साखर कारखाना, यशवंतनगर

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com