माणदेशी ऊसतोडणी मजुरांचा परराज्यात जाण्याकडे कल, का ते वाचाच...

केराप्पा काळेल 
Thursday, 6 August 2020

राज्यातील साखर कारखाने दरवर्षीप्रमाणे उचल देत असताना दुसऱ्या बाजूने परराज्यातील कारखाने दोन लाखांपर्यंत उचल देण्यास तयार असल्यामुळे मजुरांमध्ये परराज्यामध्ये जाण्याची ओढ दिसत आहे. कोयता सध्या दीड ते दोन लाख देऊन मुकादम बांधणी करत आहेत. 

कुकुडवाड (जि. सातारा) : मृग नक्षत्रात बरसलेल्या दमदार पावसामुळे ऊस पीक जोमात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांची धुरांडी पेटणार असल्याने सध्या मुकदमांकडून कोयता बांधणी (ऊसतोडणी टोळी करार) सुरू आहेत. परराज्यातील मुकादमही माणदेशामध्ये येऊन मजुरांशी बोलणी करून उचल देऊ लागले आहेत. परंतु, एक कोयता बांधणी करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, परराज्यांतील कारखाने कोयत्याला जास्त पैसे देण्यास तयार असल्यामुळे मजुरांचा परराज्यात जाण्याकडे कल दिसत आहे.

माणदेश हा दुष्काळी आणि अवर्षणग्रस्त तालुका असल्यामुळे येथे बागायती क्षेत्र कमी आहे. परिणामी हाताला काम नसल्यामुळे येथील मजूर रंगकाम, मातीकाम व ऊसतोडणीसाठी गाव सोडून स्थलांतर करत असतात. यातच कोरोनाच्या महामारीमुळे मुंबई, पुणे आणि परराज्यांत असलेले चाकरमानी गावी आल्याने काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. गावी कामधंदाही नसल्याने हातात कोयता घेण्याची वेळ आली असल्याने नाइलाजाने ऊसतोडीची उचल घ्यावी लागत आहे. 

मागील वर्षी दमदार पाऊस झाल्याने नद्यांच्या भागात यंदा चांगला पाणीसाठा असल्याने ऊस पीक पण दमदार आहे. सध्या उसाची पिके दहा ते बारा कांड्यावर आलेली आहेत. दसरा अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखानदारांना कारखान्यांची धुरांडी पेटवावी लागणार आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांची कोयता बांधणी मुकादम करत आहेत. राज्यातील साखर कारखाने दरवर्षीप्रमाणे उचल देत असताना दुसऱ्या बाजूने परराज्यातील कारखाने दोन लाखांपर्यंत उचल देण्यास तयार असल्यामुळे मजुरांमध्ये परराज्यामध्ये जाण्याची ओढ दिसत आहे. कोयता सध्या दीड ते दोन लाख देऊन मुकादम बांधणी करत आहेत. 

माणदेशातून मजूर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील कारखान्यांकडे ऊसतोडीसाठी जात असतात आणि हे कारखानने पूर्णक्षमतेने उसाचे गाळप करत असतात. यावर्षी मात्र परराज्यांतील कारखान्यांनी माणदेशावर लक्ष दिले असल्यामुळे माणदेशातून मोठ्या प्रमाणावर मजूर उपलब्ध होणार असल्याने कोयत्यास चांगला भाव आलेला आहे. 

गावटोळ्यांना बसणार फटका... 

माणदेशातील काही गावांतील ट्रॅक्‍टरमालक स्थानिक खटाव आणि खानापूर तालुक्‍यांतील कारखान्यांबरोबर करार करून गावातील लोकांना उचल न देता रोजच्यारोज रोज देऊन ऊसतोडणीसाठी वाहनाने नेत असत. सुरवातीला रोज देतात पण पुन्हा बिल निघाल्यानंतर देण्याची हमी देतात. त्यात अनेकांनी मजुरांची मजुरी न दिल्याने आता या मजुरांनी गावटोळीस बगल देऊन कोयत्याची उचल घेण्यास सुरवात केली आहे. 

""औंदा कोरोनाच्या लोकडाउनमुळे हाताला काम नाही. मागील गळीत हंगाम संपल्यापासून घरात बसून असल्यामुळे आम्ही यावर्षी सर्वांत जास्त उचल देणाऱ्या कारखान्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. परराज्यातील मुकादम आम्हाला कोयत्यास दोन लाख देण्यासाठी तयार आहेत. आपल्या राज्यातील मुकादम एक लाखापर्यंत उचल देत आहेत.'' 

रघु गोडसे, ऊसतोड मजूर 

संपादन : पांडुरंग बर्गे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Sugarcane Workers Tend To Move To Other States