सांगा... आम्ही जगायचे तरी कसे?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. जमावबंदी केल्याने लोकांना एकत्र जमण्यास मर्यादा आहेत. त्यातच प्रशासनाने जत्रा-यात्रा, विवाह समारंभांवर बंदी घातल्याने लगीणघाईवर अवलंबून असणाऱ्या अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

वाई (जि. सातारा) : बॅंड-बेंजो व तमाशातील कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना दिली. लॉकडाउमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांसह विवाहांना बंदी असल्याने या कलावंतांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. 

महाराष्ट्र बॅंड-बेंजो संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे यांनी खंडाळा येथे श्री. देशमुख यांना निवेदन दिले. त्यावेळी जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण जिल्हा लॉकडाउन केला आहे. सध्या जमावबंदी लागू असल्यामुळे, सर्व सार्वजनिक व खासगी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विवाह सोहळे, यात्रा व जत्रांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कलाकारांच्या उदनिर्वाहाची साधने बंद झाली. बॅंड-बेंजो व तमाशावर अवलंबून असणाऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. जिल्ह्यात 300-400 बॅंडपथके आहेत. प्रत्येक पथकात 25 ते 30 कलाकार असतात. प्रत्येक कलाकाराच्या कुटुंबात 7 ते 8 व्यक्ती आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात 90 हजार ते एक लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विवाह सोहळे रद्द झाल्याने केटर्स, वाढपी, आचारी, घोडेवाला यांचीही कला थांबली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात लग्न सभारंभ व गावोगावच्या जत्रा मोठ्या प्रमाणावर साजऱ्या केल्या जातात. त्यामुळे बॅंड-बेंजो व तमाशातील कलावंतांचे या प्रमुख तीन महिन्यांत विविध कार्यक्रमांच्या मिळालेल्या सुपारीवर (मानधनावर) वर्षाचे आर्थिक बजेट अवलंबून असते. कोरोनामुळे या कलाकारांचे आर्थिक बजेटच कोलमडून पडले आहे. कलावंतांना आर्थिक मदत मिळावी व लग्न समारंभात 5 ते 10 लोकांना वाद्य वाजवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

याप्रश्नी लवकर मार्ग काढून बॅंड-बेंजो व तमाशातील कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. देशमुख यांनी दिले. यावेळी नितीन भरगुडे-पाटील, नंदकुमार खामकर, गुरुदेव बरदाडे, रतनसिंह शिंदे, अतुल पवार, प्रमोद अनपट व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

शिक्षकांना 12 नको, आठ तास हवी ड्युटी, चेकपोस्टवर बिघडते आरोग्य 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Tell me ... how do we live?