या मंडळांनी केला सार्वजनिक गणेशोत्सव रद्द

विलास माने
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग व पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पाटण तालुक्‍यातील उरूल-ठोमसे विभागातील सुमारे 20 मंडळांनी यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मल्हारपेठ (जि. सातारा) ः उरूल-ठोमसे विभागातील 20 मंडळांचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्याचा एकमुखी निर्णय झाला. बोडकेवाडीच्या ओंकार गणेश मंडळाचा 50 वर्षीय उत्सवही रद्द करण्याचाही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. विभागातील कार्यकर्त्यांनी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. 

विभागातील उरूल, ठोमसे, बोडकेवाडी, तांबेवाडी, गणेवाडी, मोरेवाडी, पोळाचीवाडी, सनगरवाडी, पवार वस्ती जगदंबानगर ही सर्व गावे मल्हारपेठ जिल्हा परिषद गटात नव्याने समाविष्ट झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या प्रयत्नामुळे आणि चाफळ पोलिस चौकीचे सहायक फौजदार अमृत आळंदे यांच्या पुढाकाराने विभागातील 47 गावांना भेटी देऊन गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतानाच कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाची माहिती देण्यात आली. या वेळी गणेशोत्सवातील कडक नियमावली सांगितल्यामुळे उरूल विभागातीलही 20 गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या निर्णयाचे पोलिस विभागाने स्वागत केल. या वेळी सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलिस पाटील, कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. 

चाफळसह उरूल विभागातील गणेश मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. इतर विभागांतील मंडळांनीही या निर्णयाचे अनुकरण करणे गरजेचे आहे. गाव सुरक्षित राहण्यासाठी असे निर्णय घेणे काळाची गरज आहे. 

- अजय गोरड, सहायक पोलिस निरीक्षक, उंब्रज 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

व्वा..! सवंगड्यांनी थाटला घरगुती राखी उद्योग 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara These circles canceled the public Ganeshotsav