esakal | निपचित पडलेल्या वृद्धेला या कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

karad

कऱ्हाड शहरात रस्त्याच्याकडेला आजारी अवस्थेत वृद्ध महिला निपचीत पडली होती. त्या महिलेची स्वच्छता करून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला उपचारासाठी सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती सुधारत आहे. 

निपचित पडलेल्या वृद्धेला या कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः शहरातील वेगवेगळ्या पेठेत भटकणाऱ्या निराधार वृध्द महिलेस नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी आधार दिला. संबंधित महिला रस्त्याच्याकडेला आजारी अवस्थेत निपचीत पडली होती. त्या महिलेची स्वच्छता करून पालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला उपचारासाठी सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती सुधारत आहे. आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे शहरात कौतुक होत आहे. 

संबंधित महिला शहरातील विविध चौकांत भटकत होती. मिळेल त्या ठिकाणी ती वास्तव्य करीत होती. ही वृध्द महिला आजारी पडल्याने येथील आदिमाया परिसरात निपचीत पडली होती. ही माहिती पालिकेत काही नागरिकांनी दिली. त्यावेळी महिला कर्मचारी सुनीता आठवले, रेश्‍मा देवकुळे, अनिता वाघमारे तेथे आल्या. त्यांनी त्या महिलेस आधार दिला. सार्वजनिक स्वच्छतागृहात नेवून स्नान घातले. पालिकेचे मुकादम मारुती काटरे, हणमंत लादे, अभिजित खवळे, संजय चावरे यांना त्यांनी माहिती दिली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधला. त्यानंतर संबंधित वृद्ध महिलेस उपचारासाठी तेथे दाखल करण्यात आले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सजगता व धाडस कौतुकाचा विषय बनला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचेही शहरात कौतुक होत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार 

loading image
go to top