सातारा : चाफळ विभागामध्ये १५ ठिकाणी घरफोड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Chori

सातारा : चाफळ विभागामध्ये १५ ठिकाणी घरफोड्या

चाफळ : चाफळजवळील जाळगेवाडी, माथनेवाडी, गमेवाडी व माजगाव येथे एकाच रात्रीत १५ ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी १९ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जाळगेवाडी येथील महादेव भिकू चव्हाण हे कवठेकरवाडी येथील पाहुण्यांकडे मुक्कामी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातील पेटीमध्ये असलेल्‍या दोन चेन, दोन बोरमाळ, कानातील दोन सेट असे मिळून सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

तात्याबा मानकर यांच्या लहान मुलाचे दागिनेही लंपास करण्यात आले. गमेवाडी येथील मुबारक अब्दुल मुल्ला हे कामानिमित्त परगावी गेले होते, त्यावेळी त्यांच्या बंद घरातील १२ तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. जाळगेवाडी येथील बाळाराम गणपत साळुंखे, अमोल चंदर साळुंखे, श्रीरंग पांडुरंग साळुंखे, महादेव लक्ष्मण साळुंखे, रामचंद्र लक्ष्मण साळुंखे, कृष्ण शंकर काटे, साहेबराव अंतू शिंदे, तर माथनेवाडीतील आत्माराम नारायण माथने, आनंदा शिवराम माथने व गमेवाडीतील डॉ. अमोल बाळकृष्ण देसाई, माजगाव येथील निवृत्त पोलिस शिवाजी किसन मिरोखे (सध्या रा. मुंबई) व मोहनराव कृष्णराव देशमुख यांच्या घरातील साहित्य व रोख रक्कम चोरीस गेली. एकाच रात्रीत १५ ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमुळे चाफळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली.

सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

चाफळ परिसरात यापूर्वी चार महिन्यांत दोन वेळा चोऱ्या झाल्या आहेत. संबंधित चोरीचा तपास अजूनही लागला नसताना काल मध्यरात्रीनंतर झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास लावावा, यासह गावातील चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Satara Thief Gold Ornaments

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..