कतारमध्‍ये अडकलेले 32 भारतीय अखेर परतले मायदेशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

कोरोना लॉकडाउनमुळे परदेशातील कतारमध्ये अडकलेले पाटण तालुक्‍यातील 32 नागरिक काल रात्री उशिरा भारतात परतले. त्यांच्या घरवापसीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.

कऱ्हाड (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील नोकरीनिमित्त कतार येथे गेलेले 32 नागरिक लॉकडाउन लागल्यावर तेथेच अडकले होते. त्या अडकलेल्या नागरिकांनी भारतात परतण्यासाठी खासदार पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खासदार पाटील यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तत्काळ पत्र लिहिले. पाटण तालुक्‍यातील त्या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी विनंती केली. खासदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. कतारमध्ये अडकलेले पाटण तालुक्‍यातील 32 नागरिक शनिवारी मुंबईत पोचले. त्यांना घेऊन येणारे विमान मुंबई विमानतळावर पोचल्यावर त्यांची आरोग्य तपासणी झाली आहे. आता त्यांचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले असून, सुरक्षिततेच्या कारणावरून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 

दोहा कतार विमानतळावरून सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ज्या कामगार मंडळींना परत आणले व विलगीकरण कक्षात राहिले आहेत, त्या सगळ्यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया खासदार पाटील यांनी दिली. 

खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्या नागरिकांना परत आणण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे लोकांची तिथून येण्याची उत्तम व्यवस्था झाली. घरी पोचण्याचा आनंद त्या नागरिकांनी व्यक्त केला. आपले बांधव भारतात सुखरूप पोचल्याचा मलाही मनस्वी आनंद आहे. या कार्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचा आभारी आहे. 
-खासदार श्रीनिवास पाटील 
 

अहो आश्‍चर्यम्‌... किराणाच्या दुकानात औषधी गोळ्यांची विक्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Thirty-Two People Stranded Abroad Have Finally Returned Home