
टोलनाक्यांवर फास्टॅगची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी टॅग स्टिकर विविध ठिकाणी सुरू केलेल्या बूथवरून खरेदी करावीत; अन्यथा त्या वाहनांना टोलनाक्यांवर दुप्पट दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा वसंत पंदारकर (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभाग) यांनी दिला आहे.
वहागाव (जि. सातारा) : टोलनाक्यांवरून जाणाऱ्या चारचाकींवर एक जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला हाेता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग तसेच टोलनाक्यांची संचालक यंत्रणा सज्ज हाेती. मात्र त्यास 15 फेब्रवारीपर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. त्यानंतर फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. त्यामुळे आता महामार्गावरील आनेवाडी, तासवडे, किणी या टोलनाक्यांवरून प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनाधारकांनी फास्टॅग बसवा लागणार आहे.
देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोलनाक्यांवर भरला जाणारा टोल हा फास्टॅगद्वारेच भरला जावा, यासाठी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टटॅगची सक्ती केली आहे. स्टिकर स्वरूपातील फास्टॅग चारचाकीच्या पुढील काचेवर लावावे लागणार आहेत. या टॅगमार्फतच टोलनाक्यांवर कॅशलेस व्यवहार होईल. फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरातून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना किणी, तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर तसेच एक्स्प्रेस हायवेवरील टोलनाक्यांवर तसेच कर्नाटकात जाताना या सर्व मार्गावरील नाक्यांसह कोगनोळी टोलनाक्यावरही या टॅगचा वापर होणार आहे.
प्रतिक्षा संपली! पंधरा दिवसांत सातारकरांना मिळणार कोरोनाची लस
दरम्यान फास्टॅगसंदर्भात दुप्पट टोलवसुलीचा निर्णय घेण्यात आला असला तरी स्थानिक वाहनधारकांबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. अद्यापही अनेक स्थानिक वाहनधारकांनी वाहनांना फास्टॅग बसवलेला नाही. त्यामुळे टोलवरील स्थानिकांची वादावादी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. ही मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थ आंदाेलनाच्या पावित्र्यात असल्याचे सांगण्यात आले.
फास्टटॅग हे एक डिजिटल स्टीकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर काम करते. या टॅगमुळे कोणत्याही वाहनाला टोलनाक्यावर थांबावे लागणार नाही. टोलनाक्यावर वेगळ्या प्रकारच्या फास्टॅग लेन्स बसविण्यात आल्या आहेत. त्याद्वारे त्यातून संबंधित वाहनांची टोलची रक्कम डिजिटल रूपातून कापून घेतली जाणार आहे. यामुळे टोलनाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. टोलनाक्यावर शासकीय वाहनांना सवलत आहे. मात्र, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनांना टोलच्या नियमावलीत कोठेही सवलत नाही असे प्राधिकरणानाने नुकतेच स्पष्ट केले.
.
FASTags टोलसंदर्भात मोठा निर्णय; 100 टक्के ऑनलाइन कलेक्शनला दिली मुदत वाढ
तासवडे, किणी टोलनाक्यांवर फास्टॅगची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी टॅग स्टिकर विविध ठिकाणी सुरू केलेल्या बूथवरून खरेदी करावीत; अन्यथा त्या वाहनांना टोलनाक्यांवर दुप्पट दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
- वसंत पंदारकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभाग
Edited By : Siddharth Latkar