
सातारा : सेवागिरी देवस्थानसाठी तिरंगी लढत
विसापूर: खटाव तालुक्याच्या राजकीय पटलावर अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवडणुकीच्या सहा जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. तिरंगी लढत, पाच अपक्ष उमेदवार आणि दिग्गजांची उमेदवारी यामुळे ही निवडणूक अटीतटीची व चुरशीची होईल, असेच दिसत आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील नागरिक संघटना, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील रयत संघटना आणि रणधीर जाधव यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती संघटना या तीन पॅनेलमध्ये लढत होणार आहे.
गत ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. सुरेश जाधव, मोहनराव जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, ॲड. विजयराव जाधव यांची महाविकास आघाडी विरुद्ध रणधीर जाधव यांची जनशक्ती संघटना या दोन गटांत सरळ लढत झाली होती.
मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने नागरिक संघटना आणि रयत संघटना यांनी सवतासुभा मांडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या फुटीचा फायदा रणधीर जाधव यांच्या जनशक्ती संघटनेला होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रासह देशभरात नावलौकिक असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टची सत्तासूत्रे ताब्यात घेण्यासाठी डॉ. सुरेश जाधव, मोहनराव जाधव, रणधीर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव हे पॅनेल प्रमुख, तसेच माजी विश्वस्त प्रताप जाधव, योगेश देशमुख यांसह अनेक मातब्बर रिंगणात उतरले असून, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे पुसेगावचे मतदार आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागरिक संघटना : सुरेश सर्जेराव जाधव, मोहन रघुनाथ जाधव, योगेश हणमंतराव देशमुख, संतोष विनायक तारळकर, प्रताप सुभाष जाधव, श्रीधर बापू जाधव.
रयत संघटना : संतोष मुगुटराव जाधव, सचिन हिंदुराव देशमुख, गौरव रायसिंग जाधव, संतोष गुलाब वाघ, अभिजित सुरेश जाधव, विकास मानसिंगराव जाधव.
जनशक्ती संघटना : रणधीर सुभाषराव जाधव, सुहास सुभाष मुळे, केशव भानुदास जाधव, चंद्रकांत वसंत जाधव, अंकुश परशराम जाधव, शंकर दिलीप जाधव.
अपक्ष : उत्तम जयसिंग सावंत, किसन धोंडिबा माने, सचिन बाळासो जाधव, रोहित अशोक जाधव, संदीप सदाशिव माने.
Web Title: Satara Triangular Sevagiri Devasthan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..