
पाटण (जि. सातारा) : तालुक्यातील राजकीय पटलावरील एकमेकांचे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटांचे महाभयंकर कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या संसर्गाला आळा बसावा, या हेतून एकमत झाले आहे. हा संसर्ग वाढू नये म्हणून येऊ घातलेला गणेशोत्सवात गावागोवी "एक गाव, एक गणपती' राबवावा, असे आवाहन श्री. देसाई व विक्रमसिंह पाटणकरांचे पुत्र माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा. त्यासाठी पाटण तालुक्यात "एक गाव, एक गणपती' बसवण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. यावेळी कॉंग्रेसचे हिंदुराव पाटील, भाजपचे फत्तेसिंह पाटणकर, शिवसेनेचे जयवंतराव शेलार, मनसेचे गोरख नारकर, रिपब्लिकन पक्षाचे प्राणलाल माने, बसपचे शिवाजी कांबळे, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, तहसीलदार समीर यादव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, कोयनाचे सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. भावीकट्टी उपस्थित होते.
श्री. देसाई यांनी एक गाव, एक गणपती संकल्पना मांडली. गणेशोत्सवात ती संकल्पना गावांनी राबवावी. त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. आम्ही सर्वजण तयार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून येणारा गणेशोत्सव पाटण तालुक्यात "एक गाव, एक गणपती'ने साजरा व्हावा.
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करूया
दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका पाहता यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून गर्दी न करता साधेपणाने साजरा करूया, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले आहे. गणेशोत्सवात कोरोना संकटाचा धोका लक्षात घेऊन श्री. पाटणकर यांनी वरील आवाहन केले आहे.
श्री. पाटणकर म्हणाले, ""कोरोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही. मिरवणुका काढता येणार नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी "एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबवूया. या संकल्पनेमधून आपण गणेशोत्सवही साजरा करूया आणि सामाजिक एकोपाही वाढवूया. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता व योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. हा साधेपणा शहरातील व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाने जपला पाहिजे. कोरोना संकट जाईपर्यंत आपणा सर्वांना उत्सव साजरा करतानादेखील शासकीय नियमांच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही, याची काळजी आपण घेऊ. पण, उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. असे केले तरच संपूर्ण जगाला हेवा वाटेल, असा आदर्श गणेशोत्सव आपण साजरा करू. परंतु, हा उत्सव साजरा करताना कोरोनालाही आपण विसरता कामा नये. गणेश मंडळांतर्फे सामाजिक जनजागृती कशी केली जाईल, हे पाहावे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.