वारीबाबत ही आहे विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

राज्य सरकारने लोकभावना लक्षात घेऊन आणि आरोग्यविषयक खबरदारी म्हणून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. वारीच्या काळात विद्रोहीच्या वतीने ऑनलाइन प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येतील, असेही विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे वतीने कळविण्यात आले आहे.

सातारा : मागील काही दिवसांपासून आषाढी वारीच्या संदर्भात चर्चा सुरू होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने प्रमुख दिंडी चालक आणि संयोजकांसोबत झालेल्या बैठकीत या वर्षी पायी वारी न काढता आषाढी एकादशीला हेलिकॉप्टरमधून पाच वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख दिंड्या आणण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
 
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामधील दिंडी नंबर 27 चे हभप डॉ. सुहास फडतरे महाराज, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रसेनजित गायकवाड, कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव , सरचिटणीस कॉ. डॉ. जालिंदर घिगे, प्रवक्‍ते विजय मांडके व कॉ. अविनाश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आषाढी वारी आपला सांस्कृतिक वारसा असून, बहुजन समाजाच्या एकतेचे प्रतीक असणाऱ्या विठ्ठल रुक्‍मिणीच्या भेटीला देशभरातून सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनेही आषाढी वारीच्या वाटेवर आरोग्य शिबिराचे उपक्रम राबवले जातात.
 
विद्रोही चळवळीच्या वतीने डॉ. सुहास फडतरे महाराज यांनी काही दिवसांपूर्वी वारीच्या संदर्भात आपली भूमिका मांडलेली होती. मास्क लावल्याने भजन म्हणण्याचा आनंद घेता येणार नाही. तसे झाले तर पायीवारी ही दुःखदायक शिक्षा होईल. हे वारकरी संतांच्या विचारात बसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे कॉ. गुरव व मांडके यांनी म्हटले आहे.
 
राज्य सरकारने लोकभावना लक्षात घेऊन आणि आरोग्यविषयक खबरदारी म्हणून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. वारीच्या काळात विद्रोहीच्या वतीने ऑनलाइन प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येतील, असेही विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. बाबूराव गुरव, सहसचिव गौतम कांबळे, शिवराम ठवरे यांनी म्हटले आहे.

त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Vidrohi Sanshta Appereciated Decision Took About Wari