सातारा :'मतदार नोंदणीसाठी आता व्होटर हेल्पलाइन ॲप' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा :'मतदार नोंदणीसाठी आता व्होटर हेल्पलाइन ॲप'

सातारा : महाविद्यालयातील एकही पात्र विद्यार्थी मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिरांमध्ये जास्तीतजास्त व्होटर हेल्पलाइन ॲपचा वापर करून नवमतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमात महाविद्यालयांचा सहभागासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी सिंह बोलत होते. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एन. एस. एस. प्रमुख उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले, ‘‘एक नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नावाची नोंद केली असल्यास ती तपासून पाहावी. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांनी नावाची नोंदणी केली. किती जण शिल्लक याची माहिती तयार करावी, तसेच ज्यांनी मतदार यादीत नावाची नोंदणी केली नाही, अशा विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे.’’

हेही वाचा: 'अशा लोकांमध्ये योग्य संस्कारांची कमतरता'; राघवला केंद्रीय मंत्र्यांनी सुनावलं

दरम्यान, २७ व २८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत नवीन मतदारांचे अर्ज भरण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील नवमतदारांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये महाविद्यालयीन युवकांनी सहभाग घेऊन नावे मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहन सिंह यांनी केले. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांनी नवमतदार नोंदणीबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

loading image
go to top