'ती' म्हणते लाॅकडाऊनमुळे नात्यांची वीण झाली घट्ट

'ती' म्हणते लाॅकडाऊनमुळे नात्यांची वीण झाली घट्ट

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यापासून वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या. यामध्ये जनता कर्फ्युसह लॉकडाऊन सारखी मोठी उपाययोजना करण्यात आली. सध्याचा लॉकडाऊन हा पाचवा आहे. प्रारंभी ग्रामीणसह शहरातील नागरिकांना विशेषतः पुरुष मंडळींना लॉकडाऊन पचनी पडत नव्हता. परंतु महिलांनी मात्र कुटुंबांची समाजाची काळजी हे आपले प्रथम कर्तव्य मानून कार्यरत राहिल्या. संपुर्ण लॉकडाऊनच्या काळात घरात कोणाला काय हवे, काय नको याची काळजी घेतली. वेळ प्रसंगी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या बाहेर जाण्याच्या हट्टाला खंबीरपणे नाही म्हणण्याचे धाडसही दाखविले. कुटुंबांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी घरातील महिलांनी विशेष काळजी घेतली. तर काहींनी समाजाचेही देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पोलिस, छोटे मोठे घटकांना मदतीचा हात दिला. एरव्ही कुटुंबातील बहुतांश व्यक्ती या कामानिमित्त घराबाहेर असतात.

लॉकडाऊनमुळे सर्वच जण घरातच राहिल्याने अनेक महिला सुखावल्या. पती, मुले, सासू , सासरे यांच्यासह अन्य नात्या गोत्यांशी समरस झाल्या. कुटुंबातील व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी एकमेकांना शेअर करीत हाेते. त्यातून नात्यांमध्ये अधिक दृढता निर्माण झाल्याची भावना महिलांनी ई - सकाळशी बोलताना व्यक्त केली.

कोळकी (ता.फलटण) येथील लता आबाजी नाळे म्हणाल्या लॉंकडाऊन काळामध्ये बाहेर न पडता मी माझा पूर्ण वेळ माझ्या कुटूंबा समवेत आनंदात घालवला. घरात सर्वांनीच एकत्र राहून एकमेकांचे स्वभाव ,त्यांच्या आवडी निवडी जपण्याचा प्रयत्न केला. परिणामी घरातील वातावरण ही आनंदी राहिले. मुलांना वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकविले. त्यामुळे मुलांचाही वेळ गेला आणि त्यांना नवीन काही तरी शिकल्याचा आनंद झाला. घरातील सर्वजण मुलांबरोबर खेळ खेळून त्यांच्या बरोबर समरस झाले. लॉकडाऊन काळातील कुटुंबासमवेत एक वेगळाच आनंद देऊन गेला.

कोपर्डे हवेलीतील अलका चंद्रकांत तुपे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरापर्यंत येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली. त्या म्हणाल्या या घातक विषाणू पासून कुटुंबाची विशेष काळजी घेण्याकडे माझा कल राहिला. अलिकडच्या काळात बाहेरुन आणलेल्या वस्तू किंवा इतर साहित्य सॅनिटाईझ करण्यावर मी भर दिला. कुटुंबातील सदस्यांना सकाळी गरम पाण्याच्या गोळण्या कराव्यात, योगा करावा यासाठी सातत्याने त्यांना सांगितले. त्या सर्व गोष्टी करुन घेतल्या. जेणेकरून कोणी आजारी पडणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले. अत्यावश्‍यक कामांसाठी कोणी बाहेर निघाले तर तोंडाला मास्क आणि फेस शिल्ड लावल्या शिवाय बाहेर जाऊ दिले नाही. बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हात-पाय तोंड धुवूनच घरामध्ये प्रवेश दिला. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने मी स्वतः घरी फेस शिल्ड बनवून घरातील लोकांबरोबरच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना मोफत दिले. 

दुधेबावीतील स्वाती गजानन नाळे या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांच्यावर कुटुंबाबरोबरच ग्रामस्थांची अशी दूहेरी जबाबदारी होती असे त्यांनी नमूद केले. नाळे म्हणाल्या लॉकडाऊनचा काळ हा बिकट होता. पण आम्ही कुटूंबाबरोबरच खूप आनंदात क्षण घालवले. घरात राहून एकमेकांचे स्वभाव ओळखून एकमेकांच्या आवडी निवडी जपल्या. आवडीबरोबरच नव नव नवीन पदार्थ करणे, घरातील मुलांबरोबर वेगवेगळे खेळ खेळ खेळलो. सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे मी हार्मोनियमवर रोज एक अभंग वाजवायला शिकले. रोज एक तास आम्ही भजन व हरीपाठ घेतल्याने मुलांमध्ये अध्यात्माविषयी आवड निर्माण झाली. रामायण महाभारत श्रीकृष्ण हे कार्यक्रम मुलांसमवेत एकत्रित पाहिल्याने बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. घरामध्ये राहून पेटी ,तबला, टाळ वाजवायला शिकून संगीत मैफीलीचा आनंद घेतला. कुटुंबाबरोबरच गावातील लोकांना सदृढ आरोग्य ठेवण्याविषयी माहिती दिली.

लॉकडाऊनच्या काळात मुलांकडे विशेष लक्ष देता आलं. माझी लहान मुलगी तिसरीला आहे. तिच्या गायनाची शिकवणी मी घरीच घेतली. मोठा मुलगा दहावीत गेला आहे त्याचा अभ्यास देखील मीच घेतला. आता ते स्वतः आपापली कामे करतात. शिक्षणाबरोबरच करमणूक म्हणून त्यांच्याशी बैठे खेळ खेळते. घरातील ज्येष्ठांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे देखील माझे लक्ष असते. त्यांनी काय खावं याची विशेष काळजी घेते. पिण्यासाठी सर्वांना गरम केलेले पाणी देते असे कोपर्डे हवेलीतील अरुणा पोपट चव्हाण यांनी नमूद केले. 

खंडाळा येथील सुजाता बाळासाहेब सोळसकर म्हणाल्या लॉकडाऊन काळात घरासाठी, कुटुंबासाठी अधिकचा वेळ मिळाला. याचा सदुपयोग करत विविध नवनवीन पदार्थ बनवले. त्याचबरोबर घरकामावर काम करणाऱ्या बिहारमधील महिलांना धान्याचा पुरवठा केला. लॉकडाऊनच्या काळातच रमजान महिना होता. अनेकांना बाहेर जाऊन पदार्थ घेणे शक्‍य नव्हते तसेच मिळतही नव्हते. त्यामुळे मुस्लिम कुटुंबीयांना दररोज रोजा इफ्तारीसाठी आमच्या शेतातील फळे ,विविध खाण्याचे पदार्थ व सरबत सारखे थंड पेय दिले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केल्याने संकट काळात एक नवीन उर्मी मिळाली.

फलटणच्या अपर्णा जैन म्हणाल्या व्हॉटस्‌ अप ग्रुपच्या माध्यमातून महिलांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यावयाची याबाबत विस्तृत जागृती केली. संगीनी महिला ग्रुपच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात भगवान महावीर जयंती दिवशी फलटण येथे कार्यरत असणाऱ्या शहर तसेच ग्रामिण पोलिसांना त्यांच्या त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी जावून अल्पोपहाराचे वाटप केले. घरच्या कुटुंबासाठी सकस व पौष्ठीक नवनवीन पदार्थ शिकून घेतले व बनवून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घातले.

...तरीही सातारी कंदी पेढ्याची चवच न्यारी

साताऱ्याच्या नगराध्यक्षांची 'या'साठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com