या गावात तब्बल 58 वर्षांनंतर होणार प्रलंबित विकासकाम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

तब्बल 58 वर्षांनंतर म्हणजे 1962 पासून स्वतंत्र इमारतीअभावी होणारी पशुपालकांची परवड आता थांबणार आहे. येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एक साठी आता स्वतंत्र इमारतीस मंजुरी मिळाली आहे. येथील दवाखाना चक्क विकास सेवा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखीच त्रेधातिरपिट सुरू होती. पण, या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यश आले आहे. 

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : येथील गंभीर समस्येकडे भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांनी गतवर्षी प्राधान्याने लक्ष दिले. त्यांनी दवाखान्यासाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून स्वतंत्र इमारतीस मंजुरी घेत एक कोटी 29 लाख रुपयांचा भरघोस निधी आणला आहे. सध्या या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. 

येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एक सुरू आहे. 1962 सालापासून हा दवाखाना कार्यरत आहे. परंतु, दवाखान्यास इमारत नसल्याने तो शोधताना शेतकऱ्यांची कसरत व्हायची. येथील सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर दवाखाना व त्याखालील मैदानात जनावरांची तपासणी केली जायची. अशा परिस्थितीत डॉक्‍टरांची दिवसभर चांगलीच सर्कस व्हायची. त्यामुळे दवाखान्यासाठी स्वतंत्र इमारतीची खूप गरज होती. 

रेठरे गावासह खुबी, जुळेवाडी व रेठरे खुर्द गावांचा कार्यभार तेथून चालवला जातो. तर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कालावधीत ऊसतोडणी कामगारांच्या जनावरांचा भारही या दवाखान्यावर असतो. सुमारे सात ते आठ हजार पशुधनाची काळजी हा दवाखाना वाहतो. 

असे असूनही दवाखान्यास स्वतंत्र इमारत नसल्याने शेतकरी नाराज होते. अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची होणारी परवड जाणून अतुल भोसले यांनी याकडे प्राधान्याने लक्ष दिले. गतवर्षी त्यांनी जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून दवाखान्याच्या इमारतीसाठी निधी मंजूर करून घेतला. तब्बल एक कोटी 29 लाख रुपये मिळाला आहे. यामधून वर्षभरात इमारत उभी राहिली आहे. येथून पुढील टप्प्यात वीजजोडणी व संरक्षक भिंत उभारणी हाती घेतली जाणार आहे. 
 

""नवीन इमारतींमध्ये लहान व मोठ्या जनावरांसाठी शस्त्रक्रिया विभाग, डॉक्‍टर कक्ष, लॅबोरेटरी तसेच भांडारगृह तयार झाले आहे. दवाखाना इमारतीच्या कामामुळे पशुपालक समाधानी झाले आहेत.'' 
-डॉ. सचिन वंजारी, 
पशुधन विकास अधिकारी 
 

नवदांपत्याच्‍या संसार प्रवासात ‘कोरोना’चा थांबा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Work On Veterinary Dispensary At Rethare Budruk Is In Final Stage