esakal | नवदांपत्याच्‍या संसार प्रवासात ‘कोरोना’चा थांबा...
sakal

बोलून बातमी शोधा

शितपवाडी

शितपवाडी (ता. पाटण) येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये संबंधित व्यक्तीच्या पत्नीसह 14 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या मुलगा व सुनेचा समावेश आहे. सकाळी त्यांना तळमावले (ता. पाटण) येथील विलगीकरण कक्षातून कऱ्हाडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या निकट सहवासातील अन्य काही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ढेबेवाडीसह विविध गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

नवदांपत्याच्‍या संसार प्रवासात ‘कोरोना’चा थांबा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) : शितपवाडी येथील 72 वर्षीय व्यक्ती 14 तारखेला आपल्या मुलाच्या लग्नासाठी वापी-गुजरात येथून खासगी वाहनाने म्हसवडजवळच्या एका गावात आली होती. त्यांच्यासोबत पनवेल येथील दोघे नातेवाईकही होते. लग्नसोहळा आटोपल्यानंतर संबंधित कुटुंबीय नवदांपत्याला सोबत घेऊन मोटारीने गावी आले. पाच दिवसांपूर्वी वरपित्याला श्‍वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना कऱ्हाडला कृष्णा रुग्णालयात नेले.

तेथे केलेल्या तपासणीत ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी कऱ्हाडला कृष्णा रुग्णालयात तर त्यांच्या निकट सहवासीत 13 जणांना तळमावल्याच्या विलगीकरण कक्षात आणि संपर्कात आलेल्या अन्य दहा व्यक्‍तींना होम क्‍वारंटाइन करण्यात आले. नवदांपत्यासह, भटजी, ढेबेवाडीतील मोटारचालक, चिकन विक्रेता तसेच काही नातेवाईकांचा त्यात समावेश होता.

निकट सहवासातील व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीस पाठवण्यात आले होते. आज सकाळी त्याचा अहवाल प्राप्त झाला. कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर संबंधित कुटुंबाच्या निकट सहवासातील अन्य व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ढेबेवाडीसह विविध गावांतील लोकांना दिलासा मिळाला आहे. 
 

वधू पक्षाकडील मंडळीही निगेटिव्ह 
वरपिता कोरोनाबाधित आढळल्यानंतर म्हसवडजवळील ज्या गावी विवाह सोहळा झाला होता, तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनाही याबाबत तातडीने कळविण्यात आले होते. त्यांनी तेथील संबंधित कुटुंबातील सहा जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीस प्रयोगशाळेत पाठवले होते. काल त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे तेथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी सांगितले. 
 

सिद्धनाथाच्या नगरीत वाढली धास्ती...