महूतील युवकांनी चिऊताईला दिले घरटे अन्‌ खाऊही!

रविकांत बेलाेशे
शुक्रवार, 29 मे 2020

कोरानामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये नागरिकांनाही घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुमारे दोन ते अडीच महिने सगळ्यांकडे मोकळा वेळ खूप होता. त्याचा काहींना सदुपयोगही केला. महूतील युवकांनी एकत्र येऊन "एक घास चिऊचा' हा उपक्रम राबवला. त्यात चिमण्यांसाठी प्लायवूडची घरटी तयार केली. त्यांच्या पिण्याच्या पाणी व खाऊचीही व्यवस्था केली. 

भिलार (जि. सातारा) : कोरोनाच्या महासंकटाने गावेच्या गावे लॉकडाउन झाली आहेत. सुरक्षिततेसाठी गावांच्या सीमा सील झाल्या. गावातील कुणीही बाहेर जायचं नाही आणि गावात इतर कुणालाही प्रवेश द्यायचा नाही, अशा कडक निर्बंधामुळे गावकरीच क्वारंटाइन झालेत. जावळी तालुक्‍यातील महूतील (ता. महाबळेश्वर) गाव लॉक झाल्यामुळे काहींनी शेतीची कामे उरकली, महिलांनी घरगुती कामात गुंतवून घेतले, तर गावातील युवकांनी मात्र "एक घास चिऊचा' या अनोख्या उपक्रमामुळे वाहवा मिळवली. 

कोरोनाने सर्वांना घरात बंदिस्त करून टाकले. फक्त पक्षी आणि प्राणीच मोकळे फिरत आहेत. त्यातही चिमण्यांची घटलेली संख्या सर्वांच्याच नजरेत पडत आहे. या कमी होणाऱ्या चिमण्यांसाठी काही तरी घरटे असल्याशिवाय त्यांची संख्या वाढणार नाही, हे सर्वांना जाणवत होते; पण हे करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. लॉकडाउनमुळे ही संधी मिळाली. महू गावात चिमण्यांची घरटी बनवायची ही संकल्पना अविनाश गोळे या युवकाने मांडली. त्याला अमोल गोळे, राजेंद्र गोळे, सुजित गोळे, गणेश गोळे व जयंत जगताप यांनी साथ दिली. अविनाश यांनी त्यांच्याकडे असलेले प्लायवूडचे तुकडे उपलब्ध करून दिले. त्यांच्या घराच्या मागील मोकळ्या जागेत सर्वांनी मिळून ही लाकडी घरटी बनवली. त्यात मोलाचे कार्य केले ते अमोल ऊर्फ पिंट्या आणि राजू यांनी. हळूहळू ही घरटी तयार झाली. खिळे, तारेसाठी प्रशांत व प्रवीण गोळेंनी सहकार्य केले. गणेश गोळेंनी रंग दिला. श्री गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष भरत गोळे यांनी, तसेच शिवाजी अशोक गोळे यांनी घरटी लावण्यात सहकार्य केले. 

घरटी तयार झाल्यानंतर चिमण्यांना दाणे व पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली, त्यासाठी शरद गोळेंनी तेलाचे मोकळे डबे उपलब्ध केले. 15 लाकडी घरटी व पाच पत्र्यांचे घर तयार करून गावातील मंदिरात लावण्यात आली. ही सुरवात बघून तरुण मुले अतिशय उत्साहित होऊन आणखी घरटी बनवत आहेत. 

 

अलीकडच्या बदलाच्या काळात आणि कॉंक्रिटच्या युगात चिमण्यांची घरटी उद्‌ध्वस्त झाली. लॉकडाउनमुळे सर्व जण गावात आहेत. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन "एक घास चिऊचा' उपक्रम राबवला. चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा पुढच्या पिढीला मिळवून देण्यासाठी कारणी लावू नये, या एकाच ध्येयाने आम्ही हा उपक्रम साकारला. 

- अविनाश गोळे, महू 

 

शिवभक्ताला हाेणारी मारहाण खपवून घेणार नाही : उदयनराजे भाेसले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The youngsters from Mahut gave Chiutai house and food!