संवाद साधा, तरच सावरेल जीवन!

संवाद साधा, तरच सावरेल जीवन!
Updated on

सातारा : एकाच दिवसात काल झालेल्या दोन युवकांच्या आत्महत्या व मागील आठवड्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह सापडण्याची घटना या कोरोनामुळे एकंदर समाज व्यवस्थेत वेगाने शिरत चाललेल्या नैराश्‍याच्या भावना स्पष्ट करत आहेत. त्यामुळे कुटुंबीय व मित्रमंडळींचा एकमेकांतील सुसंवाद पुन्हा एकदा भक्कम करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. प्रशासनानेही या गोष्टी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

युवकांच्या आत्महत्या या काही आत्ताच होत असलेल्या घटना नाहीत. भौतिक सुखाच्या नादात गमावलेली मनःशांती, ताणतणावयुक्त जीवनशैली, दबाव-दडपण यांनी कुरतडलेले करिअर, अपेक्षेच्या ओझ्याने खच्चीकरण झालेले व्यक्तिमत्त्व, ढासळत असलेली कुटुंबव्यवस्था, अस्वस्थ समाजमन अशा कितीतरी कारणामुळे आजवर आत्महत्या होतच होत्या; परंतु कोरोनामुळे एक वेगळीच परिस्थिती निर्माण होत चालली आहे. लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांमध्ये नागरिकांना कामधंदे सोडून घरी बसावे लागले. शाळा व महाविद्यालयेही बंद आहेत.

घरी एकटे बसण्यातूनही काहींना नैराश्‍याची भावना येण्यास सुरुवात झाली होती. त्यामध्ये कुटुंबापासून दूर असलेल्यांचा समावेश आहे; परंतु लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर त्याचे एकएक परिणाम समोर येऊ लागले आहेत. सर्वांत महत्त्वाचा फटका व्यक्तीच्या आर्थिक उत्पन्नावर बसला आहे. शासनाने कितीही सांगितले तरी, बहुतांश जणांनी कर्मचाऱ्यांचे पगार एक तर निम्मे किंवा दिलेच नाहीत. आता अनेक ठिकाणी कामगार कपातीचे धोरण राबविण्यास सुरवात झाली आहे. त्यातच मोठ्या शहरातून गावी आलेल्यांची संख्याही अधिक असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात ती एक गंभीर समस्या बनणार आहे. काल एकाच दिवसात झालेल्या दोन आत्महत्या व मागील आठवड्यात अजिंक्‍यतारा किल्यावरून उडी मारुन आत्महत्या करतो, असा संदेश दिलेल्या मुलाचाही आज मृतदेह आढळला. त्यावरून हे स्पष्ट होत आहे.
 
कोरोनाच्या काळात मानसिक स्वास्थ बिघडण्याची शासकीय यंत्रणांना कल्पना होतीच. त्यामुळेच ऑनलाईन समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु कोरोनाच्या या टप्प्यात प्रत्यक्ष आत्महत्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी आपल्या आयुष्यात सर्व काही सुनियोजितच होईल, या मानसिकतेतून सर्वांनीच बाहेर पडणे गरजेचे झाले आहे. वास्तविक जीवनात कधीच कोणतीच गोष्ट निश्‍चित नसते. याची खूणगाठ प्रत्येकाने मनात बांधणे आवश्‍यक आहे. तरच आपण या अनिश्‍चित आणि असाधारण परिस्थितीला तोंड देण्याची तयारी करू शकतो. संघर्ष करण्याची मनाची ताकद वाढवू शकतो, या अनिश्‍चिततेच्या काळात त्यामुळे संवाद हा महत्त्वाचा भाग राहणार आहे. कुटुंबाचा एकमेकांत तसेच मित्र-मैत्रिणींचाही एक दुसऱ्याशी संवाद या काळात वाढणे आवश्‍यक आहे. त्यातून एकमेकांच्या भावनांना वाट मोकळी होणार आहे. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समस्या कोणतीही असो संवाद साधला की त्यावर मार्ग निघतोच. यावर सर्वांनी विश्‍वास ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आसपास कोणी गप्प-गप्प राहात आहे, मृत्यूबद्दल सतत विचार करते आहे, भय आणि निराशा बोलून दाखवत आहे. अशाकडे लक्ष द्या, त्याच्याशी
आशादायक बोलून आधार देणे आवश्‍यक आहे. त्याच्या भावनांना तुमच्याशी बोलताना वाट मोकळी होऊ द्या. तरच संकटाच्या या काळात सर्वजण सही सलामत तरून निघू शकतो. 


प्रशासकीय पातळीवर धोरणाची गरज 
कोरोनाच्या पुढच्या टप्प्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे केवळ
ऑनलाइन समूपदेनाची सुविधा उपलब्ध करून उपयोग नाही. समाजातील प्रत्येक घटकाला या काळात भेडसावणाऱ्या
प्रश्‍नांवर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी एक ठोस धोरण
ठरविण्याची गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com