सातारा : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ती पी. बी. गजेंद्रगडकर अशा थोर पुरुषांनी जेथे शिक्षण घेतले त्या दीडशेहून अधिक वर्षांच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला पुन्हा वैभवाचे दिवस येणार आहेत. थोर परंपरा आणि साताऱ्याचे एके काळी वैभव असलेली ही शाळा रयत शिक्षण संस्थेकडे सुधारण्यासाठी, गुणवत्ता वाढण्यासाठी चालवावयास देण्याचा ठराव काल जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने प्रतापसिंह हायस्कूल चालवायला दिल्यास, शाळेची गुणवत्ता वाढवून या शाळेला पुन्हा वैभवाचे दिवस आणू, असे मत रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले आहेत.
महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद सातारा संचलित श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा ही एकमेव सातारा जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक शाळा आहे. सन 1821 मध्ये तत्कालीन श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी संस्थानातील मुलामुलींना शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने खासगी पाठशाळा सुरू केली होती. नंतर 1851 मध्ये औपचारिक शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता सातारा एलिमेंटरी स्कूलची रीतसर स्थापना झाली. नंतर त्याचे नाव शासकीय शेती शाळा सातारा असे झाले व 1951 मध्ये शाळेला 100 वर्षे पूर्ण झाल्याने शाळेचे नामकरण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा असे करण्यात आले.
तत्कालीन परिस्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव हायस्कूल असल्यामुळे हजारोंच्या घरात विद्यार्थी संख्या होती. राजवाड्याच्या प्रशस्थ इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत होते. या शाळेमध्ये दैनंदिन शिक्षणाबरोबरच टायपिंग, वाणिज्य, शेती इत्यादी व्यावसायिक शिक्षण दिले जात होते. या शाळेतून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत पंतप्रतिनिधी भवानराव श्रीनिवासराव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. गजेंद्रगडकर अशा नामवंत थोर व्यक्तींनी याच शाळेत शिक्षण घेतले आहे. अशा या शाळेला गेल्या काही वर्षांत दुरवस्था आली. ही जिल्ह्यातील एकमेव शेती शाळा होती. परजिल्ह्यातून विद्यार्थी या शाळेत शिकायला येत असत. काळाच्या ओघात सातारा शहरात 41 हायस्कूल झाली, तसेच यामध्ये 14 इंग्रजी माध्यमाच्या शाळाही स्थापन झाल्या. त्यामुळे, तसेच भौतिक सुविधेअभावी या शाळेचा पट कमी- कमी होत गेला. सद्यःस्थितीत या शाळेचा पाचवी ते दहावीचा पट अवघा 51 आहे. या शाळेची समृद्ध आणि उज्ज्वल परंपरा लक्षात घेऊन शाळेला पुन्हा वैभवाचे दिवस यावेत म्हणून काल झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत ही शाळा रयत शिक्षण सस्थेला चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी अध्यक्ष उदय कबुले, माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला मोठी परंपरा आहे. महाराजा सयाजीराव हायस्कूलची स्थापना होण्यापूर्वी कर्मवीर अण्णा आपल्या वसतिगृहातील मुले याच शाळेत शिकायला घालत होते. रयत शिक्षण संस्थेची लाईफ मेंबरची पहिली पिढी याच शाळेत शिकली होती. जिल्हा परिषदेने संधी दिल्यास या शाळेला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेऊ.डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.