
झेडपीसह मान्याचीवाडीचा गौरव
सातारा - राज्य शासनाने पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी ''माझी वसुंधरा अभियान’ राबविले होते. या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट काम केल्याने ग्रामपंचायत गटात जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गाव व राज्यस्तरावर जिल्ह्याची कामगिरीही उत्तम झाल्याने सातारा जिल्हा परिषदेला आज जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधत मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दरम्यान, या अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणारे मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने व ग्रामसेवक प्रसाद यादव, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानात सातारा जिल्ह्यातील एक हजार २९० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण अभियान, घनकचऱ्याचे संकलन, साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, रस्त्यांच्या बाजूला हरितीकरण करणे, जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, नाले व तळ्यांचे पुनरुज्जीवीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया करणे, सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, बायोगॅस प्रकल्पाची उभारणी आदी पर्यावरणाशी संबंधित आधारावर उपाययोजना करत शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुरू केले होते. या अभियानात पर्यावरणाशी निगडित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या घटकांच्या आधारावर काम केले. यामध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल होण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते.
Web Title: Satara Zp Manyachiwadi Gram Panchayat Honored For Outstanding Performance In Mazi Vasundhara Abhiyan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..