दहावी परीक्षेसाठी शाळा तिथे केंद्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ssc exam
दहावी परीक्षेसाठी शाळा तिथे केंद्र!

दहावी परीक्षेसाठी शाळा तिथे केंद्र!

सातारा : दहावीची अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या असून, लेखी परीक्षेस १५ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या परीक्षेचे नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करताना यंदा शाळा तिथे केंद्र होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ६४७ केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार असून, दहावीच्या परीक्षेसाठी ३९ हजार ९०३ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू होते. त्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, नोव्हेंबर २०२१ पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पुन्हा शालेय शिक्षण ऑनलाइन झाले. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का ऑफलाईन, असा प्रश्‍न उपस्थित होत होता. परंतु, यंदा जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाने केल्यानंतर त्या वेळापत्रकानुसार घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. सद्य:स्थितीत दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. यंदा शैक्षणिक वर्षाचे वर्ग १५ जूनला ऑनलाइन सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा विळखा कमी झाल्याने शाळा व महाविद्यालयांचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले.

दरम्यान, जिल्ह्यात याआधी दहावीची ११६ परीक्षा केंद्रे होती. मात्र, आता ६४७ केंद्रांमध्ये परीक्षा होणार आहे. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच १५ परिरक्षक व इतर १०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

दहावीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रे, भरारी पथके आदींचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर परीक्षेसाठी कोरोना संसर्गामुळे नियमांचे पालन करून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

Web Title: School There Is Center For 10th Exam Maharashtra State Board Education Department Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..