शिरवडेत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

ओंकार आपल्या चार मित्रांसोबत दुपारी दोन-अडीचच्या सुमारास कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहण्यास गेला होता
schoolboy dead after drowning in river satara news
schoolboy dead after drowning in river satara news sakal

शिरवडे : शिरवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय १४) त्याचे नाव आहे. ओंकार ज्योतिर्लिंग विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता. ओंकार मित्रांसोबत पोहण्यास गेल्या होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच शिरवडे गावावर शोककळा पसरली.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार आपल्या चार मित्रांसोबत दुपारी दोन-अडीचच्या सुमारास कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहण्यास गेला होता. थर्माकोलच्या आधारे पोहण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओंकारचा थर्माकोल सुटल्याने कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मिळून आला नाही. घाबरलेल्या मुलांनी याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली.

यानंतर कराड येथील पाणबुड्यांच्या सहाय्याने ओंकारचा शोध घेण्यात आला. मात्र दीड तासांपूर्वी बुडालेला मृतदेह पाणबुडयांनी तत्काळ शोधून काढला. आपल्या एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर ओंकारच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. नदीपात्रात मुलगा बुडाल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली. यावेळी नागरिकांनी कृष्णा पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घटनेची नोंद तळबीड पोलीस स्टेशन येथे झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार काळे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com