
मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी घरीच श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची पूजा, आरती केली. फेसबुक लाईव्ह व युट्युबच्या माध्यमातून सुवर्णमंडित समाधी पूजन व रथाच्या लाइव्ह दर्शनाचा आनंद घेतला.
पुसेगाव/विसापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यात्रेतील धार्मिक विधी पूर्वापार प्रथेनुसार आणि रूढी व परंपरेनुसार करण्यात आले. गावाला प्रदक्षिणा घालण्याची रथोत्सवाची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दिवसभर मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. पुसेगावमधील बाजारपेठ अत्यावश्यक सेवा सोडून दिवसभर बंद होती.
पहाटे पारंपरिक धार्मिक विधी, पूजा आदी कार्यक्रम मठाधिपती, पुजारी व विश्वस्तांच्या उपस्थितीत झाले. श्री सेवागिरी महारांच्या पादुका व प्रतिमेचे पूजन करून रथात स्थापना करण्यात आली. जमावबंदी असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व त्यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते रथपूजन झाले. याप्रसंगी, पोलिस उपअधीक्षक गणेश केंद्रे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, तलाठी गणेश बोबडे उपस्थित होते.
मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचा दिवस. या दिवशी सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका हा फुलांनी सजविलेल्या व नोटांच्या माळांनी फुललेला रथ गावातून फिरविण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथ मिरवणूक रद्द केल्यामुळे रथपूजनाचा कार्यक्रम होताच रथ ओढणाऱ्या मानकऱ्यांनी प्रवेशद्वाराच्या आतच परंपरेनुसार झेंड्यापर्यंत मंदिर परिसरात रथ ओढला व पूर्ववत जागेवर आणून ठेवला. त्यामुळे गावाला प्रदक्षिणा घालण्याची रथोत्सवाची परंपरा प्रथमच खंडित झाल्याचे भाविक बोलत होते.
भाविकांनाे! श्री यमाईदेवीच्या मंदिराचे दरवाजे तात्पुरते राहणार बंद
दरम्यान, रथ व समाधी दर्शनास भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला होता. परवानगीशिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. पुसेगाव शहर आणि मंदिरास जोडले गेलेले सर्व रस्ते बॅरिगेड लावून पोलिस प्रशासनाने बंद केले होते. परगावातील कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला गेला नाही. गावातील नागरिकांनीही विनाकारण रस्त्यावर फिरकू दिले गेले नाही. मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी घरीच श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची पूजा, आरती केली. फेसबुक लाईव्ह व युट्युबच्या माध्यमातून सुवर्णमंडित समाधी पूजन व रथाच्या लाइव्ह दर्शनाचा आनंद घेतला.
शिवेंद्रसिंहराजेंसह समर्थकांना न्यायालयात मिळाला दिलासा
रथावर पैसे बांधून नवस पूर्ण करण्याच्या परंपरेला ऑनलाइन ट्रान्सफरच्या माध्यमातून भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.
- मोहनराव जाधव, अध्यक्ष, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव
Edited By : Siddharth Latkar