esakal | सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

बोलून बातमी शोधा

Covid Vaccination

सातारकरांनाे! पालिकेने सुरक्षिततेसाठी घेतला तातडीने निर्णय

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : साता-यातील भवानी पेठेतील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईतील सात भाजी विक्रेत्यांना काेविड 19 ची लागण झाल्याने सातारा पालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील तीन दिवस भाजी मंडई बंद ठेवली आहे. या भाजी मंडईतील सर्व विक्रेत्यांची काेराेना चाचणी झाल्यानंतरच मंडई सुरु केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली.

कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने सातारा पालिकेने उपाययोजनांची तीव्रता वाढवली आहे. शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी, दुकानदार, हातगाडीधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजवाडा चौपाटीवरील काही विक्रेत्यांना कोविड 19 ची लागण झाली होती. त्यानंतर सदाशिव पेठेतील एका दुकानातील काही कर्मचारी बाधित झाले हाेते.

गाेलमाल है भाई सब गाेलमाल है; Covid19 साता-याचा डॅशबाेर्ड सुधारा

राज्य शासनाने विकेंड लाॅकडाउन जाहीर करताना अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना व्यवसायासाठी परवानगी देताना काेविड 19 ची चाचणी अथवा लसीकरण झाले असावे या दाेन गाेष्टींचे बंधन घातले आहे. तरी देखील काही लाेकांकडून त्याचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नियमबाह्य वागणा-यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले.

सातारा शहरातील राजवाडा भाजी मंडईतील सात भाजी विक्रेत्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तातडीने भाजी मंडई बंद करण्याचे आदेश दिले. बापट यांनी सर्व भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. जोपर्यंत सर्व विक्रेत्यांची चाचणी होत नाही व त्यांचे अहवाल प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत पुढील तीन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेने सुरक्षितता म्हणून ताडीने आरोग्य विभागाच्या मदतीने भाजी मंडईचा संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्याची कार्यवाही केली.

आज (मंगळवार) सकाळपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी गर्दी झालेली आहे. यामध्ये बहुतांश नागरिक हे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईतील विक्रेते असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: कोरोनामुळे संपूर्ण कुटुंबाला धोका; पालकमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता