सातारकरांच्या संयमाला सलाम! गैरसमजुतीमुळे झालेला तणावही लगेच निवळला

सातारकरांच्या संयमाला सलाम! गैरसमजुतीमुळे झालेला तणावही लगेच निवळला

सातारा : साताऱ्यातील बहुचर्चित ग्रेडसेपरेटरच्या एका भुयारी मार्गिकेवरील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव असणारा फलक फाटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आज सकाळी साताऱ्यात काही काळ तणाव निर्माण झाला. रात्री कोणीतरी हा फलक फाडल्याची चर्चा सुरू झाल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले. मात्र, पोलिसांनी तो फलक ताब्यात घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता हा फलक नैसर्गिकरीत्या फाटून खाली पडल्याचे शनिवारी (ता.९) सायंकाळी स्पष्ट झाले. पोलिसांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

साताऱ्यातील पोवई नाक्‍यावरील ग्रेडसेपरेटरचे उद्‌घाटन शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केले. सेपरेटरमधील भुयारी मार्गिकांना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज, श्रीमंत छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह (दादा महाराज) यांची नावे असणारे फलक लावण्यात आले आहेत. यापैकी वायसी कॉलेज परिसरातील मार्गिकेवर असणारा श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे नाव असणारा फलक खाली पडल्याचे शनिवारी सकाळी काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती सातारा शहर पोलिसांना, तसेच सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांना दिली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ऍड. दत्तात्रय बनकर, किशोर शिंदे, ज्ञानेश्‍वर फरांदे, बाळासाहेब ढेकणे, माजी नगरसेवक संजय शिंदे, अशोक घोरपडे, संग्राम बर्गे यांच्यासह सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी, तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले.

बीइजीच्या जवानाला जिल्हावासियांचा सलाम; वर्णेकरांना अश्रू अनावर!

घटनास्थळी दाखल झालेले अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे व इतर वरिष्ठांनी फलकाची, तसेच परिसराची पाहणी करत उपस्थितांना शांततेचे आवाहन केले. या वेळी सुनील काटकर, माधवी कदम, मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, किशोर शिंदे, बाळासाहेब गोसावी यांनी तीव्र शब्दांत फलक फाडणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. पोलिसांनी साविआच्या नेत्यांशी चर्चा करत तो फलक ताब्यात घेत परिसरात बंदोबस्त वाढवला. 

Breakfast Updates: पाकिस्तानात ब्लॅकआऊट ते भारत बायोटेकचं स्पष्टीकरण, वाचा महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळी साडेदहाच्या सुमारास घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल दाखल झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेत तपासाच्या सूचना केल्या. यानंतर पोलिसांनी ताब्यातील फलकाची, तसेच मार्गिकेच्या परिसरातील फुटेजची पाहणी केली. फुटेजच्या पाहणीत हा फलक नैसर्गिकरीत्या फाटून खाली पडल्याचे दिसून आले. याबाबतचे पत्रक पोलिस अधीक्षक कार्यालयाने सायंकाळी प्रसिद्धीला दिले. या प्रकरणात कोणत्याही व्यक्‍तीचा हात नसल्याचे समोर आल्याने त्याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याचेही पोलिस अधीक्षक कार्यालयाने पत्रकात नमूद केले आहे.

सातारकरांच्या संयमाला सलाम

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून राज्यात सध्या वादंग सुरू आहे. त्यातच श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचा मार्गिकेवरील फलक फाडल्याचा आरोप शनिवारी सकाळी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या तणावात भर घालणारी वक्‍तव्ये काही जणांनी करत "सातारा बंद'ची हाक दिली. याच काळात सोशल मीडियावर सुद्धा अशाच प्रकारचे प्रक्षोभक संदेश प्रसारित होऊ लागले. याची दखल घेत पोलिस दलाने वेगाने हालचाली करत योग्य त्या पद्धतीने परिस्थिती हाताळत फलक फाटण्यात, तसेच खाली पडण्यामागील कारणांचा छडा लावला. या काळात साताऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सातारकरांनी संयम राखणे पसंद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com