
पंचनाम्यांचे आकडे आल्यावर मदत देणार : मकरंद पाटील; विधान परिषदेत शशिकांत शिंदे यांच्या अतिवृष्टीच्या प्रश्नाला उत्तर
सातारारोड : राज्यात मार्च, एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांमध्ये, तर मे महिन्यात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी यासंदर्भातील आमदार शशिकांत शिंदे, राजेश राठोड, अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांच्या प्रश्नावरील उत्तरात विधान परिषदेत दिली. शेती पिकांचे एकूण ७५ हजार ३५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक लाख ६८ हजार ७५० शेतकरी प्रभावित झाले असल्याचे आणि त्यासाठी सुमारे २१३ कोटींची नुकसान भरपाई अपेक्षित असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.