शेतकरी संघटनांची कार्यपद्धती देशी दारू दुकानांसारखी; रघुनाथदादांची शेट्टी, खाेतांवर टीका

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 26 November 2020

नेते शरद जोशी यांचा जन्म सातारा येथे झाला असल्याने यात्रेची समाप्ती १२  डिसेंबर रोजी सातारा येथे करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

सातारा  : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून (ता. २८) निपाणी येथून जनप्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिली. या वेळी त्यांनी नाव न घेता माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका केली. राज्यातील काही शेतकरी संघटनांची कार्यपद्धती सरकारमान्य देशी दारू दुकानांसारखी असल्याचे वक्‍तव्य केले.
 
पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील अनेक शेतकरी संघटना या कारखानदारांच्याच आहेत. या संघटना सरकारला सामील असून, त्यांची आणि सरकारची युती आहे. या संघटना तडजोड करून घेण्यात आघाडीवर असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणखीन बिकट होत चाललेत. केंद्र सरकार शेतकरी विरोधी कायदे करून त्यांना संपवायला निघाले आहे. आज अस्तित्वात असणाऱ्या काही शेतकरी संघटना या सरकारमान्य शेतकरी संघटना बनल्या आहेत. या संघटनांची अवस्था लिलावात निघणाऱ्या देशी दारू दुकानांसारखी आहे. दिशाभूल करणाऱ्यांच्या जिवावर दराची मागणी करण्यात येते आणि मग कुठे तरी बसून तडजोड करून दुकानदारी सुरू ठेवण्यात येते.''

एकरकमी एफआरपीचे कारखान्यांना आदेश देऊ ; अजित पवारांचे स्वाभिमानीला आश्वासन

पिचलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच निपाणी येथून ही यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, पुणे या जिल्ह्यातून ही यात्रा जाईल. नेते शरद जोशी यांचा जन्म सातारा येथे झाला असल्याने यात्रेची समाप्ती १२  डिसेंबर रोजी सातारा येथे करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास आढाव, राजेंद्र बर्गे, दादासाहेब पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप कांणे, विजय पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shetkari Sanghtana President Raghunath Patil Addressed Media In Satara