
National Consumer Day : ग्राहकांनी हक्कांबाबत सजग राहावे; शिवाजीराव जगताप
फलटण : ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत नेहमीच सजग राहायला हवे. शासनस्तरावरील योजनांबाबत जर कुणाला अडचणी असतील, तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनामध्ये मांडल्यावर त्यावर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी तहसीलदार समीर यादव, परिविक्षाधीन प्रांताधिकारी दादासाहेब दराडे, नायब तहसीलदार सौ. डी. एस. बोबडे, एन. डी. काळे, पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सातारा जिल्हा संघटक किरण बोळे,
तालुका संघटक मेजर डॉ. मोहन घनवट, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक सदाशिव मोहिते, पोलिस हवालदार सतीश दडस, बाजार समितीचे दत्तात्रय डांगे, पंचायत समितीतील प्रशासन अधिकारी सतीश जाधव, व्यापारी असोसिएशनचे चेतन घडिया, सहायक निबंधक सहकारी संस्था फलटण कार्यालयातील सहकार अधिकारी सौ. एस. पी. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
या वेळी बैठकीत तलाठी, ग्रामसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, जर त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक गावे असतील, तर कोणत्या वारी ते कुठल्या गावात उपलब्ध असतील याबाबत त्यांनी माहिती फलक लावणे, वीज वितरण कंपनीचे वायरमन गावात कधी कोठे भेटतील, एखाद्या दुर्घटना प्रसंगी तातडीने वीज पुरवठा खंडित करण्यासाठी कोणाशी संपर्क करावा, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होणारे धान्य वाटपाचे प्रमाण ग्रामस्थांना समजण्यासाठी त्याचा फलक शासनमान्य रास्त भाव दुकान आणि ग्रामपंचायत कार्यालय अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी लावावा आदी सूचना या वेळी करण्यात आल्या.
अंत्योदय योजनेचा फेर सर्व्हे करा...
फलटण शहरात अंत्योदय योजनेचा लाभ घेणारे काही लाभार्थी चारचाकीतून व महागड्या दुचाकीवरून धान्य नेण्यास येतात. सधन असतानाही जर ते अंत्योदय योजनेचा लाभ घेत असतील तर तो खऱ्या गरजू गरिबांवर अन्याय आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचा सर्व्हे करावा, अशी मागणी ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. जर असे कुणी लाभार्थी लाभ घेत असतील, तर तक्रार करावी, त्याबाबत शहानिशा करून त्याबाबत कारवाई करण्यात येईल, असे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.