Shivendra Raje : मेडिकल कॉलेज उभारणीस खो घालणे चुकीचे; शिवेंद्र राजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendra Raje

Shivendra Raje : मेडिकल कॉलेज उभारणीस खो घालणे चुकीचे; शिवेंद्र राजे

सातारा : अनेक अडचणींवर मात करून मेडिकल कॉलेजचा प्रकल्प मार्गी लागला आहे. हा प्रकल्‍प जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असल्‍याने त्‍याच्‍या उभारणीला विरोध करून या प्रकल्पाला खो घालण्याचे प्रकार चुकीचे आहेत. स्थानिकांचे जे काही प्रश्न असतील ते जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून निश्चित सुटतील. त्यामुळे एका चांगल्या प्रकल्पाला विरोध करून हा प्रकल्प रखडवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. प्रकल्पाचे काम जर कोणी बंद पाडत असतील, तर त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यातील मुलांना वैद्यकीय शिक्षण जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, जिल्हावासीयांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी आणि जिल्ह्यात सुसज्ज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि अनेक अडचणींवर मात करून सातारा मेडिकल कॉलेजचा प्रकल्प मार्गी लागला आहे.

शासनाच्या जागेवर मेडिकल कॉलेज उभे राहात असून, या प्रकल्पाला काही लोक विरोध करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे.विरोध करून हा प्रकल्प रखडवल्यास हा प्रकल्प रखडून प्रकल्प खर्च वाढणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचे आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

स्थानिकांनी त्‍यांचे प्रश्न जिल्हा प्रशासन, संबंधित लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांच्याकडून सोडवून घेणे आवश्‍‍यक असून, त्‍यासाठी सर्व अनुकूल आहेत. जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचे प्रकार कोणीही करू नयेत, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.