मराठा आरक्षणाचा अंतिम लढा 'छत्रपतीं' च्या नेतृत्वाखाली व्हावा; शिवेंद्रसिंहराजेंची भावना

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 28 January 2021

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन ते न्यायालयात टिकविले होते. पण सध्या या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे अशी भावना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली.

सातारा : राजकीय चौकटी बाजूला ठेऊन सर्वांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही सरकारपर्यंत पोचविण्याची गरज आहे. त्यासाठी नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे तरी दिली पाहिजे. त्यासाठी खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale)  यांनी येथे आज (गुरुवार) व्यक्त केली.

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी स्थापन केलेल्या (कै.) अण्णासाहेब पाटील विकास फौंडेशनच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले बोलत होते. व्यासपीठावर खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, एकनाथ जाधव, गुलाबराव जगताप, रमेश पोफळे, आदी उपस्थित होते.
 
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अण्णासाहेबांनी मराठा आरक्षणाचा पाया रचला. आता त्याचा कळस आपण गाठत आहोत. पण मुद्दाम काहीजण या आरक्षण प्रश्नात खोडा घालण्याचे काम होत आहे. आरक्षण मिळू नये म्हणून न्याय हक्कापासून गरजूंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचा दृष्टीकोन टोलवा टोलवीचा झाला आहे. त्याला आपण सर्वजण कारणीभूत आहोत. कारण आपण संघर्ष करण्याची भूमिका कधी घेतली नव्हती. पण मराठा क्रांती मोर्चा निघाले त्यानंतर सरकार जागे झाले. आता आणखी एखादी कोपर्डीच्या घटनेची वाट पहातोय का, असा प्रश्न उपस्थित करून राजकीय पक्ष बाजूला ठेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे. तरच हा लढा आपण जिंकू याचा विचार केला पाहिजे.

या चळवळीचे नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे तरी दिली पाहिजे. खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली भूमिका घेतली पाहिजे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही सरकारपर्यंत पोचविण्याची  गरज आहे. मराठा समाजासाठी नरेंद्र पाटील यांची तळमळ दिसत असून समाजासाठी त्यांनी त्यांच्यातील एक व्यक्ती गमावला आहे. त्यांच्या मनातील तळमळ पाहून त्यांच्या कार्यात सर्वांनी त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

शिवेंद्रसिंहराजेंचा डाव राष्ट्रवादीसाठीही ठरणार फायदाचा?

लक्षात ठेवा; मराठा समाज डाेक्यावर घेऊन नाचताे किंवा चपलेखालीही घेताे

...यांना कूठली भाषा कळती तेच समजेना; उदयनराजे साता-यात गरजले

शरद पवारांच्या सातारा दौऱ्याला आमदारांनी खो घातला? पालकमंत्र्याची चुप्पी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinghraje Udayanraje Bhosale Maratha Reservation Satara Marathi News