शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, काळचौंडीत प्रकार; आंदोलनानंतर पोलिसांकडून तक्रार दाखल

सलाउद्दीन चाेपदार
Sunday, 17 January 2021

सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे हे तक्रार घेण्यास तयार नसल्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर घडलेल्या घटनेची तक्रार घेण्यात आली.

म्हसवड (जि. सातारा) : काळचौंडी (ता. माण) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी येथील सहा जणांनी शिवसेनेचे माण तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्या हातात घेऊन हल्ला केल्याची घटना घडली. माण, खटावच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी सुमारे एक तास म्हसवड येथील पोलिसांच्या भूमिकेविरोधात पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर हल्ल्याची तक्रार 24 तासांनंतर घेण्यात आली आहे.
 
याबाबत पोलिस ठाण्यात मुलाणी यांनी दिलेल्या तक्रारीत फिर्यादीने म्हटले आहे, की ता. 15 जानेवारी रोजी दुपारी 4:15 चे सुमारास काळचौंडी गावच्या हद्दीत काळचौंडी चौक ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात तालुकाप्रमुख बाळासाहेब महंमद मुलाणी (रा. हिंगणी, ता. माण) व उपतालुकाप्रमुख शिवदास महादेव केवटे (रा. म्हसवड) हे मतदानाविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेताना त्या ठिकाणी तलवारी व काठ्या हातात घेऊन विशाल बाळासो माने, विलास काशिनाथ माने, सचिन काशिनाथ माने, स्वप्नील सचिन माने, ऋषिकेश बाळासाहेब माने, विष्णू आबाजी माने (सर्वजण रा. काळचौंडी ता. माण) हे सहा जण आले. त्यांनी सर्वांनी माझ्यावर व शिवदास केवटे (रा. म्हसवड) यांच्यावर हल्ला केला, 
तसेच माझ्या खिशातील झालेल्या झटापटीत पाच हजार तीनशे रुपये कोणीतरी काढून घेतले आहेत.

प्रशासन सतर्क : मरिआईचीवाडीत सापडल्या मृत कोंबड्या; नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेत
 
घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी सात ते रात्री आकरापर्यंत म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी थांबलो असतानाही पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास तयार नव्हते. हा प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व वरिष्ठांना कळवल्यानंतर शनिवारी पुन्हा घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले असता सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे हे तक्रार घेण्यास तयार नसल्यामुळे पदाधिकारी व शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर घडलेल्या घटनेची तक्रार घेण्यात आली.

महाबळेश्‍वर : साडे सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहीरीतील गव्यास जीवदान

या वेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, संघटक रामभाऊ जगदाळे, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील यांनी भेट दिली. शहरप्रमुख राहुल मंगरुळे, सुशांत पार्लेकर, उपतालुकाप्रमुख आंबादास शिंदे, बाळासाहेब जाधव, कृष्णराज आवळे-पाटील, अंबादास नरळे, अमित कुलकर्णी, सोमनाथ कवी, किशोर गोडसे, समीर जाधव, ए. के. नामदास आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Agitation At Mashwad Police Station Satara Marathi News