
नेर तलावाचा कालवा चार महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने फुटला आहे. त्यामुळे या कालव्याद्वारे ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रातील रब्बी पिके सध्या पाण्याची गरज असतानाही पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी मागणी करूनही फुटलेला कालवा अद्यापही दुरुस्त झालेला नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
पुसेगाव (जि. सातारा) : कालव्याची तातडीने दुरुस्ती करून रब्बी पिकांना पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी करूनही दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नुकतेच आंदोलन केले. या वेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अमिन आगा, तसेच मुगटराव कदम, सूरज शिर्के व खटाव परिसरातील शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
नेर तलावाचा कालवा चार महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने फुटला आहे. त्यामुळे या कालव्याद्वारे ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रातील रब्बी पिके सध्या पाण्याची गरज असतानाही पाण्यापासून वंचित आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी मागणी करूनही फुटलेला कालवा अद्यापही दुरुस्त झालेला नाही. दुरुस्तीसाठी किमान एक महिना तरी लागणार असल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करा, अशी मागणी शेतकरी वारंवार करत होते; पण अधिकारी या मागणीची दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांचे पाण्याअभावी नुकसान टाळण्यासाठी प्रताप जाधव यांनी याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
अधिवेशनात शक्ती कायदा मांडणार : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
परंतु, या इशाऱ्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे श्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खटाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले. दोन दिवसांत काम सुरू न झाल्यास गंभीर परिणाम होतील, असा या वेळी इशारा देण्यात आला. कार्यवाही का होत नाही असा अधिकाऱ्यांना जाब विचारून पंधरा दिवसांत पाणी मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करून त्यांना खोऱ्याचा दंडा भेट देण्यात आला. दरम्यान, शिवसैनिकाचा आक्रमकपणा पाहून दोन दिवसांत डागडुजी कामास सुरवात करू, असे आश्वासन तेथील अधिकाऱ्यांनी दिले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे