वाळू चोरीवरुन सेना-प्रशासनात जुंपली, सेनेची प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे

रुपेश कदम
Thursday, 22 October 2020

काही दिवसांपासून संजय भोसले व तत्कालीन प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यात चारा छावणी व वाळू या विषयांवरून जुंपली आहे. भोसले यांना त्यांच्या प्रशासनावरील आरोपांची कोणीच दखल घेत नाही, असे वाटल्याने त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

दहिवडी (जि. सातारा) : अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन कोणी सोडले? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास विलंब होत असल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याची दखल घेत प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी संबंधितांवर वाळू चोरीच्या अनुषंगाने तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश तहसीलदारांना दिले. 

काही दिवसांपासून श्री. भोसले व तत्कालीन प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यात चारा छावणी व वाळू या विषयांवरून जुंपली आहे. भोसले यांना त्यांच्या प्रशासनावरील आरोपांची कोणीच दखल घेत नाही, असे वाटल्याने त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाळूचा ट्रक कोणी सोडला, तसेच चारा छावण्यातील भ्रष्टाचार चौकशीचे पुढे काय झाले, या मागण्या घेऊन ते बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसले. 

बिहार जिंकण्यासाठीच भाजपचं लसीकरण; चव्हाणांची जाहीरनाम्यावर सडकून टीका

या वेळी त्यांच्यासोबत माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, उपतालुका प्रमुख शिवदास केवटे, म्हसवड शहरप्रमुख राहुल मंगरुळे, विभागप्रमुख अमित कुलकर्णी, अंबादास नरळे, दगडू जगदाळे, सुभाष काटकर, युवासेना प्रमुख कृष्णराज आवळे पाटील, तालुका संघटक रामभाऊ जगदाळे, सोनू मदने, सोमनाथ कवी आदी शिवसैनिक उपस्थित होते. या आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी संजय भोसले यांच्याशी चर्चा केली. सर्व प्रकरणांची माहिती घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल, असे सांगून वाळू चोरीशी संबंध असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत, असे सांगितले. लिखित पत्र हाती मिळताच संजय भोसले यांनी आपले धरणे आंदोलन स्थगित केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Deputy District Chief Sanjay Bhosale Agitation In Dahivadi Satara News