सावित्रीबाई फुलेंच्या गावाला आठ कोटी द्या, सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अशपाक पटेल
Wednesday, 14 October 2020

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव हे "ब' वर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. भारतातील स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे भारतातून हजारो पर्यटक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे गावच्या विकासासाठी भरीव देणगी देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

शिरवळ (जि. सातारा) : सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथील "ब' वर्ग पर्यटन म्हणून प्रस्तावित विकासकामांना प्रशासकीय मान्यतेसह आठ कोटी 82 लाख निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे खंडाळा तालुकाप्रमुख आदेश जमदाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्र देऊन केली आहे. दरम्यान, मुंबई येथे जाऊन प्रधान सचिव विकास खारगे यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले. या वेळी महेंद्र भोसले, अमित नेवसेही उपस्थित होते. 

या पत्रात म्हटले आहे की, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव हे "ब' वर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. भारतातील स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे भारतातून हजारो पर्यटक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्या दृष्टीने सांस्कृतिक सभागृह, दोन मजली प्रतीक्षालय इमारत, बहुद्देशीय ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक शाळेची इमारत, नायगाव येथे अंतर्गत सिमेंटचे रस्ते व सिमेंटची सांडपाण्याची व्यवस्था उभी करण्यासाठी एकूण आठ कोटी 82 लाखांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी पत्राव्दारे करण्यात आली आहे. 

परतीच्या पावसाचा तडाखा! कवठ्यात शेतमाल भिजला; पाटणला शेतकरी दुहेरी संकटात

हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्यामार्फत प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय यांना सादर केला असल्याचेही शिवसेना तालुकाप्रमुख जमदाडे यांनी सांगितले. याप्रमाणेच खंडाळा तालुक्‍यातील केसुर्डी, सांगवी, भोळी, मोर्वे, अंदोरी, कवठे, भादेसह 19 गावांसाठी अंतर्गत रस्ते, गटारे व पिकअप शेड आदी विकासकामांना निधीचीही मागणी करण्यात आली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Has Demanded 8 Crore For Naigaon Satara News