"रेमडिसिव्हर' चा दर कमी झाल्याने कंपन्यांकडून पुरवठा बंद? आरोग्य यंत्रणा हतबल

उमेश बांबरे
Tuesday, 29 September 2020

खासगी रुग्णालयांना तब्बल दोन हजार 63 इंजेक्‍शन्स दिली होती. ही परत करण्याच्या बोलीवर दिली गेली होती. पण, आता जिल्हा रुग्णालयातील गंभीर रुग्णांना इंजेक्‍शन्स उपलब्ध नसल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे.
 

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यात गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसिव्हरच्या इंजेक्‍शनसाठी धावपळ करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यात या इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात दररोज 150 इंजेक्‍शनची गरज आहे. मात्र, इंजेक्‍शनचे दर कमी झाल्याने कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याने नातेवाईकांना काळाबाजारातून इंजेक्‍शन घ्यावी लागत आहेत. जिल्हा रुग्णालयातून परत देण्याच्या बोलीवर खासगी रुग्णालयांना दोन हजार इंजेक्‍शन दिली आहेत. तीही तुटवड्यामुळे परत मिळू शकत नाहीत.
 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अपुरी पडणारी यंत्रणा आता पुरेशी झाली असली तरी रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्सचा तुटवडा भासत आहे. गंभीर रुग्णांना रेमडिसिव्हर इंजेक्‍शन तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत असून बहुतांशी वेळा काळ्या बाजारातून चढ्या दराने ही इंजेक्‍शन्स घ्यावी लागत आहेत. सातारा जिल्ह्याला दोन महिन्यांपूर्वी शासनाकडून पाच हजार 221 इंजेक्‍शन्स मिळाली होती. त्याचा वापर जिल्हा रुग्णालय, कोरोना सेंटर तसेच अधिगृहित केलेल्या रुग्णालयातील गंभीर रुग्णांसाठी केला गेला. खासगी रुग्णालयांनाही इंजेक्‍शन दिली गेली. खासगी रुग्णालयांना तब्बल दोन हजार 63 इंजेक्‍शन्स दिली होती. ही परत करण्याच्या बोलीवर दिली गेली होती. पण, आता जिल्हा रुग्णालयातील गंभीर रुग्णांना इंजेक्‍शन्स उपलब्ध नसल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे.

रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्सच्या निर्णयाबाबत साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज  

जिल्ह्यात दररोज 700 ते एक हजार बाधित रुग्ण सापडतात. त्यापैकी पाच टक्के रुग्ण गंभीर असल्याने त्यांना या इंजेक्‍शनची गरज भासते. साधारण दररोज 140 ते 150 इंजेक्‍शन्स लागतात. एका रुग्णाला किमान सहा इंजेक्‍शन्सची आवश्‍यकता भासते. सध्या मागणी करूनही इंजेक्‍शनचा पुरवठाच होत नसल्याने तुटवडा भासत आहे. सांगली व रत्नागिरी येथूनही इंजेक्‍शन मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, तेथेही तुटवडा आहे. खासगी रुग्णालयांना दिलेली दोन हजार इंजेक्‍शन्स परत मिळत नाहीत. सध्या मागणी केलेली पाच हजार इंजेक्‍शन्स येत्या दोन दिवसांत उपलब्ध होतील, अशी आशा आहे.

शालेय शिक्षणमंत्र्यांची कोरोनावर मात, काळजी घेण्याचं केलं आवाहन
 
या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, ""शासनाने सहा कंपन्यांशी इंजेक्‍शन पुरविण्याचा करार केला आहे. त्यातील मायलॉन, हेट्रो व सिप्ला कंपन्यांकडून इंजेक्‍शन्स पुरविली जात होती. हेट्रो कंपनीने दहा हजार, सिप्ला कंपनीने एक हजार, तर मायलॉन कंपनीकडून पाच हजार इंजेक्‍शन्स पुरवठा करण्याचा निर्णय झाला होता. पूर्वी एका इंजेक्‍शनचा दर तीन हजार 360 रुपये होता, आता दर कमी होऊन तो दोन हजार 812 रुपये झाला आहे. त्यामुळे हेट्रो कंपनी इंजेक्‍शन पुरविण्यास तयार नाही.'' 

शासकीय रुग्णालयांकडून इंजेक्‍शन्सची मागणी होते. पण, खासगी रुग्णालये व फार्मासिस्टनीही कंपन्यांकडे इंजेक्‍शन्सची ऑर्डर दिली तर बल्क स्वरूपात इंजेक्‍शन जिल्ह्यात उपलब्ध होतील. त्यातून इंजेक्‍शनचा पुरेसा पुरवठा होऊ शकेल. 

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shortage Of Remdesivir Injection Satara News