
कोणत्याही परिस्थितीत खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकायच्या आहेत.
Shashikant Shinde : 'राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणणाऱ्या भाजपला आपली ताकद दाखवून द्या'
सातारा : आगामी काळात राजकारण यापेक्षाही टोकाचे होणार आहे. आपली लढाई भाजप (BJP) व शिंदे गट शिवसेनेशी (Shiv Sena) आहे. कोणत्याही परिस्थितीत खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडून आणायच्या आहेत.
त्यासाठी बूथ कमिटी हा आपला पाया असून, एक महिन्याच्या आत बूथ कमिटी पूर्ण कराव्यात. आजपासून आपली लढाई सुरू झाली असून, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन विभागीय बूथ प्रमुख आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केले.
राष्ट्रवादी भवनात काल बूथ कमिटी बांधणी संदर्भात बैठक झाली. या वेळी माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, अमित कदम, दीपक पवार, सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘साडेतीन जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अशी टीका करणाऱ्यांना आपण आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आपली लढाई भाजप व शिंदे गट शिवसेनेशी आहे. कोणत्याही परिस्थितीत खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी बूथ कमिटी हा पक्ष बांधणीचा पाया असून, आगामी एका महिन्याच्या आत बूथ कमिटी पूर्ण कराव्यात.
आजपासून राष्ट्रवादीचे अभियान सुरू झाले असून, सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि तो राहणारच या पद्धतीने काम करून दाखवून देऊ, असंही शिंदे म्हणाले. या वेळी रामराजे निंबाळकर, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील आदींची भाषणे झाली. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातील सूचना मांडल्या. सुनील माने यांनी प्रास्ताविक केले.