फलटण तहसील कार्यालयाच्या बाहेर कामगारांचे अभ्यंगस्नान; ग्रॅच्युइटीसाठी आंदाेलन

किरण बाेळे
Sunday, 15 November 2020

पाच दिवस उलटूनही कारखाना किंवा प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त निवृत्त कामगारांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान तहसील कार्यालयाबाहेर रस्त्यावर करून कारखाना आणि प्रशासनाचा निषेध केला.

फलटण शहर (जि. सातारा) : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी ग्रॅच्युइटीसाठी ऐन दिवाळीत उपोषण सुरू केले आहे. कारखाना आणि प्रशासन लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयाबाहेर निवृत्त कामगारांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून कारखाना आणि प्रशासनाचा निषेध केला.
 
फलटण तालुका संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम कारखान्या निवृत्त कामगारांचे गॅच्युइटीसाठी आंदोलन सुरू असून, पैसे मिळणार नाहीत तोवर आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. श्रीराम साखर कारखाना लि. फलटण व नीरा व्हॅली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून सन 2017 ते 2020 या वर्षात एकूण 60 कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगारांची कारखान्याकडे व अर्कशाळेकडे अडीच ते तीन कोटी रुपये गॅच्युईटीची रक्कम थकित आहे. त्याचप्रमाणे थकित पगार व रजेचा पगार अशी येणे रक्कम आहे.

ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन नाना पाटील पोलिसांना तुरी देत पसार झाले!

कायद्यातील तरतुदीनुसार कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर 15 दिवसांचे आत संबंधित संस्थेने गॅच्युइटीची रक्कम कामगारांना देणे बंधनकारक आहे; परंतु गेली तीन वर्ष कामगारांनी हेलपाटे मारूनही कारखान्याने त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम अद्याप दिली नाही. कामगार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्न कार्यासाठी, वयोवृद्ध वडिलांच्या औषध पाण्यासाठी, दैनंदिन गरजेसाठी, तसेच कामगारांनाही स्वत:च्या औषध पाण्यासाठी या रकमेची आवश्‍यकता आहे. असे असताना कारखान्याचे व्यवस्थापन ही रक्कम बुडविण्याच्या प्रयत्नात आहे, असा कामगारांचा आरोप आहे.

पहाटेच्या सुखद गारव्यात रसिकांनी घेतला ऑनलाइन गाण्यांचा आस्वाद

पाच दिवस उलटूनही कारखाना किंवा प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त निवृत्त कामगारांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान तहसील कार्यालयाबाहेर रस्त्यावर करून कारखाना आणि प्रशासनाचा निषेध केला. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shriram Sahakari Sugar Factory Retired Workers Agitation In Phaltan Satara News