
ढेबेवाडी : शाळेत शिकत असताना खांद्यावर स्टार लागलेले खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी दिसले, की त्यांचा खूप अभिमान वाटायचा. आपणही त्यांच्यासारखे समाजात मानसन्मान आदर असलेला गर्दीतला वर्दीवाला बनावे, असे सारखे वाटायचे. मात्र, पुढे हे स्वप्न स्वप्नच न ठेवता त्याचा पाठलाग करत राहिलो. तब्बल चौदा - चौदा तास अभ्यास केला आणि ध्येय गाठलेच. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातलेला मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथील शुभम भास्करराव पाटील सांगत होता.