सिध्दनाथाच्या जयघोषाने कोपर्ड हवेली दुमदुमली

जयंत पाटील
Saturday, 28 November 2020

गावच्या इतिहास प्रथमच रथोत्सव रद्द करुन यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली‌. गावात पै पाहुण्याची वर्दळ दिसली नाही. मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द झाले.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील सिध्दनाथ देवाची यात्रा पाहुण्यांवीना गावपुरती मर्यादीत साजरी करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टंन्स राखत भाविकांनी देव दर्शन घेतले. रथाच्या ठिकाणी गर्दी होवू नये म्हणून रथाच्या चारी बाजूंनी कनात बांधण्यात आली होती.

कोपर्डे गावची यात्रा परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बैठक घेवून एकमताने यात्रा रद्द केली आणि कोपर्डे ग्रामस्थांनी त्याचे तंतोतंत पालन करुन साध्या पद्धतीने गावस्वरुपी यात्रा साजरी केली. मेवा मिठाई, खेळणे पाळण्याची दूकाने, खाद्याचे स्टाॅल कुठे ही दिसले नाहीत. यात्रेच्या पहिल्या दिवसाची सुरवात बुधवारी बारा दिवसाचे उपवास सोडून झाली तर गुरुवारी सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा लग्न सोहळा मर्यादित लोकांच्या व पुजारी, बलुतेदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शुक्रवारी (ता .27) सिध्दनाथाच्या मंदिरा समोरील पटांगणात रथ आणि सासनकाठी उभी करण्यात आली होती. रथामध्ये विराजमान सिध्दनाथ माता जोगेश्वरी व जवळच उभी केलेल्या सासनकाठी यांचे सोशल डिस्टन ठेवून भाविकांनी दर्शन घेतले व गुलाल खोबऱ्याची उधळण करत सिध्दनाथाच्या नावान चांगभलंचा जयघोष केला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावच्या इतिहास प्रथमच रथोत्सव रद्द करुन यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली‌. गावात पै पाहुण्याची वर्दळ दिसली नाही. मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द झाले.

खूप बाेलण्याची इच्छा असलेल्या पवारांनी बाळासाहेबांची कमिटमेंट पाळली

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhanath Jogeshwari Yatra Koparde Haveli Satara News