मायणीची यात्रा रद्द; राजकीय गटातील स्पर्धा टळली

संजय जगताप
Monday, 14 December 2020

कुस्त्यांचा फड, विविध स्पर्धा, शर्यती, मनोरंजनाचे कार्यक्रम होणार की नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते.

मायणी (जि. सातारा) : येथील ग्रामदैवत सिद्धनाथाची मंगळवारी (ता. 15) होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला. याबद्दल नाथ मारुती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, युवा नेते सुरेंद्र गुदगे यांचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत. यात्रेच्या निमित्ताने दोन-दोन ठिकाणी वर्गणी द्यावी लागणार नसल्याने नागरिक, व्यापारी व नोकरदार खुश आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिणामी अनेक यात्रा भरविण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर येथील श्री सिद्धनाथाची रिंगावन यात्रा होणार की नाही, प्रथेनुसार गुदगे व येळगावकर गटाच्या स्वतंत्र यात्रा होणार का? कुस्त्यांचा फड, विविध स्पर्धा, शर्यती, मनोरंजनाचे कार्यक्रम होणार की नाहीत, याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. दरम्यान, नाथ मारुती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा नियोजनाची बैठक झाली. त्यामध्ये नागरिक, व्यापारी व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. यंदा रिंगावन यात्रेत केवळ धार्मिक कार्यक्रम होतील, अन्य गर्दी करणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.

कुसरुंडच्या मळाईदेवीची यात्रा रद्द

दरम्यान, कोरोनामुळे सर्व व्यापारी, नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. यात्रा रद्द केल्याने विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी दोन्ही राजकीय गटातील स्पर्धा टळणार आहे. स्वतंत्र यात्रा भरविण्यासाठी दोन्ही गटांना द्यावी लागणारी वर्गणी बचत होणार आहे. तसेच, यात्रेच्या निमित्ताने किरकोळ कारणावरून होणाऱ्या गटा-गटांतील वादाला यंदा संधी मिळणार नाही. गावामध्ये शांतता राहणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

यात्रा रद्द करण्याच्या निर्णयाने सर्वांनाच दिलासा मिळाला असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असा निर्णय घेणे आवश्‍यक होते. 

- नामदेव शिंदे, नागरिक, मायणी

माण तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार ?

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhanath Yatra Mayani Cancelled Surendra Gudge Satara News