
कऱ्हाड: सातारा जिल्ह्यातील वीर जवानांनी शत्रूला नामोहरम करताना जिवाची बाजी लावली आहे. याच मातीतील सुपुत्र ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शत्रूबरोबर दोन हात करताना दहशतवादी, अतिरेक्यांशी लढताना जिल्ह्यातील जवानांचे रक्त सांडले आहे. त्यांच्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी ९ आणि १० ऑगस्टला सिंदूर महारक्तदान यात्रा आयोजित केली आहे. जम्मू-काश्मीर येथे कमांडो हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरात एकावेळी हजार जण रक्तदान करतील. त्यासाठी खास रेल्वेने हजार जण जम्मू-काश्मीरला रवाना होणार आहेत, अशी माहिती हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.