Makar Sankranti Festival : सुवासिनींनाे! घरीच वाणवसा घ्या, सीतामाईची यात्रा रद्द

रुपेश कदम
Thursday, 14 January 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून, कोणीही या मंदिरासह ग्रामीण भागातील कोणत्याही मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील प्रसिद्ध व महिलांची अतिशय जिव्हाळ्याची आजची (ता. 14) मकर संक्रांतीदिवशी भरणारी कुळकजाई येथील सीतामाईची यात्रा रद्द करण्यात आली आहे. सुवासिनींनी सीतामाई मंदिराकडे न येता आपापल्या घरीच वाणवसा घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी सीतामाईचा डोंगर सुवासिनींच्या गर्दीने फुलून जातो. कारण या दिवशी सीतामाईची वार्षिक यात्रा भरते. इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या ठिकाणी मोठी गर्दी असते. कारण हजारो-लाखो सुवासिनींना सीतामाई आपल्या जिवाभावाची वाटते. या परिसराबद्दल अख्यायिकासुध्दा तशाच आहेत. सीतामाईला प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदेशाने प्रभू लक्ष्मणाने ज्या ठिकाणी सोडले, ते हेच ठिकाण आहे. तसेच येथेच सीतामाईचा पुढील काळ व्यतित झाला. त्यामुळे येथे येऊन सुवासिनी सीतामाईच्या सुख-दु:खाशी समरस होऊन जातात. येथेच सोबत आणलेलं जेवण करतात. विविध खेळ खेळतात, वाणवसा घेतात व अतिशय समाधानाने येथून जातात. 

गोंदवल्यात संचारबंदी लागू; समाधी मंदिरासह आठवडा बाजार बंद

फलटणात यंदा वाणवस्यावर संक्रांत; राम मंदिरात महिलांना गर्दी करण्यास बंदी!

मात्र, तमाम सुवासिनींचा हा आनंद यंदा कोरोनाने हिरावून घेतला आहे. तहसीलदार बाई माने यांनी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कलम 144 लागू केले आहे. गुरुवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संबंधित मंदिर व्यवस्थापनानेसुध्दा वाणवसा घेण्यासाठी कोणीही महिला येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून, कोणीही या मंदिरासह ग्रामीण भागातील कोणत्याही मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांनाे! श्री यमाईदेवीच्या मंदिराचे दरवाजे तात्पुरते राहणार बंद

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sita Mai Yatra Canclled Of Kulkjai Satara Marathi News