
सैनिकांनी जपली मानवाप्रती संवेदना; रक्तदान करुन बजावलं राष्ट्रीय कर्तव्य!
कऱ्हाड : भारत मातेच्या रक्षणासाठी सैन्यदलातील जवान २४ तास डोळ्यात तेल घालुन सशस्त्र पहारा देतात. मराठा लाईट इंन्फंट्रीचे अनेक अधिकारी, जवान विजय दिवस समारोहासाठी येथे आले आहेत. त्यांना आज झालेल्या रक्तदान शिबीराची माहिती मिळताच त्यांनी थेट शिबीरस्थळी जावुन रक्तदान करण्यासाठी रांग लावली. आपल्या रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचतील या उद्दात हेतुने सैन्यातील अधिकारी आणि जवांनी दाखवलेही ही माणुसकी मानवाप्रती असलेली संवेदनाच दाखवुन जाते. अनेक रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी व अन्य आजारांसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते. अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे ब्लड बॅंकांच्या माध्यमातुन अशी रक्तदान शिबीरे आयोजीत करुन गरजुंना गरजेवेळी रक्त उपलब्ध करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
त्याचा चांगला उपयोग रुग्णांसाठी होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याअंतर्गतच यशवंत ब्लड बॅंकेच्या सहकार्याने विजय दिवस समारोह समितीने यंदाही रौप्यमहोत्सव रक्तदान शिबीराचे कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते. विजय दिवसाच्या कार्यक्रमासाठी देशभरातुन मराठा लाईट इंन्फंट्रीचे अधिकारी, जवान येथे आले आहे. त्यांना आज रक्तदान शिबीर आहे याची माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या रक्तामुळे एकाद्याचे प्राण वाचले तर आपण समाजासाठी काहीतरी करु शकलो असे वाटेल या उद्दात्त हेतुने तातडीने रक्तदानासाठी रांगच लावली. शिवाजी आखाड्यात अनेक अधिकारी आणि जवानांनी रक्तदान करुन मानवाप्रती संवेदना व्यक्त करत राष्ट्रीय कर्तव्यही जपले.
या शिबीराचे आज सकाळी संध्या पाटील, तहसीलदार विजय पवार, मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, कालिकादेवी कुटुंबप्रमुख मुनिर बागवान, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख नितीन काशिद यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, उद्योजक राजेंद्र पाटील, रक्तदान उपक्रमाचे प्रमुख रमेश पवार, प्राचार्य गणपतराव कणसे, विनायक विभुते, पर्यावरण मित्र चंद्रकात जाधव, रमेश जाधव, प्रा. भगवान खोत, राजेश जाधव, रजनिश पिसे, भरत कदम, जालिंदर काशिद, रत्नाकर शानबाग, डॉ. संदिप यादव, मेजर एस मिश्रा, सुभेदार संजय पाटील, नायब सुभेदार संदीप पवार उपस्थित होते. भरत कदम यांनी आभार मानले.