कार्तिकची आई ही त्याचे सर्वस्व होती. त्या कुटुंबाच्या आधार होत्या. घराच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे होमगार्ड म्हणून काम करीत होत्या. आठवीपासून सुटलेले शिक्षण त्यांनी लग्नानंतर मोठ्या निश्चयाने पदवीपर्यंत पूर्ण केले होते.
सातारा : पोलिस भरतीचे (Police Recruitment) स्वप्न घेऊन सकाळी व्यायामासाठी निघालेल्या आईला अचानक चक्कर आल्याचे निमित्त होते. मुलगा आईला रिक्षाने दवाखान्यात नेतो. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेल्याने डॉक्टर त्याच्या समोरच आईला मृत घोषित करतात अन् क्षणात तो मातृछत्रापासून पोरका होतो. समोर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच त्याला दहावीचा पेपरही द्यावा लागतो अन् दहावीचा परीक्षार्थी (10th Exam) असलेला तो नियतीने घेतलेली सत्त्वपरीक्षाही देतो.