
गव्हाच्या वाढीसाठी थंड, कोरडे व स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान आवश्यक असते. सध्याचा विचार करता वापशाअभावी गहू पिकाच्या पेरणीस उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीस प्राधान्य दिले आहे.
कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्यात गतवर्षीपेक्षा जास्त 42 हजार 780 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. गतवर्षी तालुक्यात जिल्ह्यात सर्वांत जास्त 30 हजार 567 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे रब्बीची पिके चांगली येतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांनी रब्बीसाठी ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बाजरी, मूग पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पाऊसकाळ भरपूर असल्याने पिके चांगली येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. तालुक्यात रब्बीच्या पेरणीला वेग आला आहे. सुरवातीस कोरडवाहू तसेच वापसा आलेल्या क्षेत्रावर कांदा, मका आणि ज्वारीची पेरणी उरकली आहे. मळ्याच्या (चिबडाच्या) शेतामध्ये जसजसा वापसा येईल, तसे गहू, हरभरा पेरणीला गती आली आहे. त्यामुळे अजून पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. उन्हाळ्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उशिरा वापसा येणाऱ्या शेतात चाऱ्याची पिके घेतली जातील.
पालकांनो विश्वास ठेवा आणि मुलांना शाळेत पाठवा
यंदा भरपूर पाऊस झाला असल्याने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पारंपरिक पिकांसह नवीन पिकांची निवड करावी. त्याबरोबर अंतरपिकांची लागवड करावी. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. उपलब्ध पाणी साठ्यामुळे शेतकरी फळबागा, चारापिके तसेच बागायती पिके घेण्याकडे वळत आहे. सर्वत्र पाणीसाठा असल्यामुळे यावर्षी उत्पादनात भरघोस वाढ होईल, अशी शक्यता आहे. गव्हाच्या वाढीसाठी थंड, कोरडे व स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त हवामान आवश्यक असते. सध्याचा विचार करता वापशाअभावी गहू पिकाच्या पेरणीस उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीस प्राधान्य दिले आहे.
Edited By : Siddharth Latkar