पर्यटकांवरील बंदीने पाचगणीच्या टेबललॅण्डवरील 700 व्यावसायिक चितेंत

रविकांत बेलोशे
Friday, 25 September 2020

लॉकडाउनमधील कार्यकाळात घोडे एकाच जागेवर तबेल्यात बांधले जात असल्याने ते आजारी पडत आहेत.

भिलार (जि. सातारा) : पर्यटनस्थळावरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन टेबललॅण्ड व्यापारी असोसिएशनच्या वतीने पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना देण्यात आले. कोरोनाचे संकट कोसळल्याने शासनाने 20 मार्चपासून पूर्णतः लॉकडाउन करून पर्यटकांना बंदी घालण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

पाचगणी शहरातील बहुतांश लोकांचे जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून असल्याने पर्यटनस्थळावरील व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. लॉकडाउनला सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे, परंतु, अद्याप जनजीवन सुरळीत होऊ शकलेले नाही. पठारावरील घोडे, घोडागाडी, स्टॉलधारक, आईसक्रीमवाले अशा सुमारे 700 व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

NCB कडून मुंबईत तीन ठिकाणी छापेमारी, ड्रग्स डिलर्सची दाणादाण

घोडेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. घोड्यांना लागणारे खाद्यही उपलब्ध करताना त्यांची अवस्था बिकट झाली आहे. लॉकडाउनमधील कार्यकाळात घोडे एकाच जागेवर तबेल्यात बांधले जात असल्याने ते आजारी पडत आहेत. त्यामुळे आतापर्यंत येथील सुमारे 25 घोड्यांचा मृत्यू झाला आहे. उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून पर्यटन सुरू व्हावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाचगणीत कोरोना केअर सेंटरचा निर्धार, आमदार मकरंद पाटलांचा पुढाकार

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start Tourisim Demands Hawkers From Panchgani Tableland Satara News