esakal | गृहराज्यमंत्र्यांकडून टोलनाक्यावर कोकणवासियांचे 'स्वागत'
sakal

बोलून बातमी शोधा

satara

गृहराज्यमंत्र्यांकडून टोलनाक्यावर कोकणवासियांचे 'स्वागत'

sakal_logo
By
तानाजी पवार

वहागाव (सातारा) : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या मुंबईकर कोकणवासियांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दुपारी तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर आस्थेवाईकपणे विचारपूस करीत स्वागत केले.

आपल्या व्यवसाय व नोकरीनिमित्त मुंबई परिसरात वास्तव्यास असणारे बहुतांशी कोकणवासिय प्रतीवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे येत असतात. राज्य शासनाने प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षीही या मुंबईकर कोकणवासियांसाठी टोल सवलतीसह विविध उपाययोजनांची सोय केली होती. दरम्यान, आज दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यावर मुंबईहून कोकणाकडे निघालेल्या कोकणवासियांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. श्री. देसाई यांनी वाहनधारक, प्रवाशांना त्यांच्या प्रवासातील सेवा-सुविधांची विचारपूस करीत माहिती घेतली आणि त्यांना गणेशोत्सावासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: बाजार समित्यांत उभारणार सौर प्रकल्प

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा, टोलनाक्यावर त्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी राज्य शासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांसमवेत वेळोवेळी बैठका घेऊन योग्य नियोजन केले होते. आज सातारा जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे येथील टोलनाक्यावर त्याची पाहणी केली असता वाहनधारकांची चांगल्या पद्धतीची सोय झाली असल्याचे दिसून आले. तसेच राज्यात अजूनही कोरोनाचे सावट असल्याने सर्व गणेशभक्तांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे पालन करुन शांततेत हा गणेशोत्सव साजरा करावा.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, तळबीड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा, नरेंद्र लिबे यांच्यासह पोलिस कर्मचारी, वाहनधारक व टोल कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी प्रवाशी, वाहधारकांसाठी तळबीड पोलिस व तासवडे टोलनाका व्यवस्थापनाच्यावतीने मोफत चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचाही लाभ वाहनधारक, प्रवाशांनी घेतला. तसेच राज्य शासनाने मोफत टोल सुविधेसह वाहनधारकांसाठी केलेल्या विविध उपाययोजना बद्दल वाहधारक, प्रवाशांनी राज्य शासनाचे आभार मानले.

loading image
go to top