रोजचा खर्च भागवणं मुश्किल बनलंय, टॅक्सी व्यावसायिक हतबल

अभिजीत खुरासणे
Monday, 19 October 2020

महाबळेश्वरमध्ये सुमारे चारशेहून अधिक टॅक्सी व्यावसायिकांची संख्या असून दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने टॅक्सी व्यवसायावरच अनेक कुटुंब अवलंबून आहेत. रोजचा खर्च भागवणे आता मुश्किल झाले असून अनलॉकच्या पार्श्वभूमीवर येथील सर्वच प्रेक्षणीय स्थळे सुरु करून आम्हा टॅक्सी व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिक करीत आहेत.

महाबळेश्वर (जि. सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना मार्च महिन्यापासून आजअखेर गेली सात महिने येथील टॅक्सी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पूर्णतः बंद केले. दरम्यान, महाबळेश्वर पर्यटनस्थळी असलेली महाबळेश्वर दर्शन सहल, सर्व पॉईंट्स, मंदिर-किल्ले खुली करावीत या मागणीचे निवेदन महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले. 

यावेळी आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वर टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर, उपाध्यक्ष इर्शाद कुरेशी, सचिव सी. डी. बावळेकर, जावेद खारकांडे आदी उपस्थित होते. टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना १८ मार्चपासून आजअखेर येथील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील ''अनलॉक ५'' मध्ये इतर व्यावसायिकांना ज्याप्रमाणे दिलासा देण्यात आला, त्याचप्रमाणे महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून येथील विविध पॉईंट्स, किल्ले व मंदिर खुले करून टॅक्सी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती वजा मागणी संघटनेने निवेदनात नमूद केली आहे. 

महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षांना अटक; नोकरीच्या आमिषातून तिघांना गंडा

महाबळेश्वरमध्ये सुमारे चारशेहून अधिक टॅक्सी व्यावसायिकांची संख्या असून दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने टॅक्सी व्यवसायावरच अनेक कुटुंब अवलंबून आहेत. रोजचा खर्च भागवणे आता मुश्किल झाले असून अनलॉकच्या पार्श्वभूमीवर येथील सर्वच प्रेक्षणीय स्थळे सुरु करून आम्हा टॅक्सी व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिक करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement To District Collector Shekhar Singh Of Mahabaleshwar Local Taxi Professionals Association Satara News