आचारसंहिता संपताच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : अजित पवार

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 26 November 2020

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता मोफत गणवेश योजना राबविणे, मागासवर्गीय मुलींचे उपस्थिती भत्त्यात वाढ करणे अथवा ही योजना बंद करणे या आदी मागण्यांचे निवेदन उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने कऱ्हाडच्या वेणूताई सभागृहात अजित पवार यांची भेट घेऊन दिले.

सातारा : प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद असून आचारसंहिता संपल्यानंतर विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास दिल्याचे माहिती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी दिली.

उदय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने कऱ्हाडच्या वेणूताई सभागृहात अजित पवार यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करून निवेदन दिले. त्याप्रसंगी अजित पवार बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता मोफत गणवेश योजना राबविणे, मागासवर्गीय मुलींचे उपस्थिती भत्त्यात वाढ करणे अथवा ही योजना बंद करणे.

कार्यकर्त्यांना गाजरं दाखवावी लागतात, अजित पवारांचा विराेधकांना टोला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना डिजिटल करण्यासाठी स्वतंत्र अनुदान मिळणे, शिक्षण सेवकांचे मानधन वाढवावे, शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे, नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षकांचे प्रश्न सोडविणे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलीविषयक धोरणांवर संकल्पाने चर्चा करून सर्वसमावेशक बदली धोरण लागू करणे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेब लाड, शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, अरुण पाटील, संजय नागरे, संचालक सुभाष शेवाळे, विनायक चव्हाण, अंकुश नागरे, मोहनराव सातपुते, शशिकांत तोडकर, विष्णुपंत रोकडे, राजेंद्र लोहार आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement Given By Primary Teachers Committee To Deputy Chief Minister Ajit Pawar Satara News