
नागठाणे (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर अतीत (ता. सातारा) येथे आज पहाटे दोन मालट्रक, एक आरामबस जीप यांच्या अपघातात चार जण जखमी झाले. अपघातग्रस्त मालट्रक महामार्गावर आडवा झाल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
याबाबत 'हायवे हेल्पलाईन'कडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून धाग्यांचे बंडल घेऊन निघालेल्या मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर हा मालट्रक दुभाजकावर चढून तसाच पुढे असलेल्या ओढ्याच्या पुलाला जोरात जाऊन धडकून महामार्गावरच पलटी झाला. याचवेळी पाठीमागून येत असलेल्या खाजगी आरामबसच्या चालकाने अपघातग्रस्त ट्रक चुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस मालट्रकला जोरात घासत गेल्याने तिचा उजव्या बाजूचा पत्रा फाटला गेला. त्यात आराबसमधील एक प्रवाशी महिला (नाव व गाव समजू शकले नाही) गंभीर जखमी झाली. याच दरम्यान मालट्रक उलटत असतानाच चालकाने जीव वाचविण्यासाठी बाहेर उडी मारली. ती उडी दुभाजकामधल्या मोकळ्या जागेतून थेट 100 फूट खाली गेल्यामुळे ट्रकचालक प्रकाश राजाराम शिंदे (रा. हितवाड, जि. सांगली) हा देखील गंभीर जखमी झाला. या दोघांनाही उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात मालट्रकची पुढील दोन्ही चाके धडीसह निसटून बाजूला झाली.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यानंतर काही काळातच महामार्ग पोलिस, हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त मालट्रक बाजूला काढत असतानाच आणखी एक मालट्रक भरधाव वेगाने आला. यावेळी त्याने अपघातग्रस्त वाहने ओलांडत असलेल्या सरकारी जीपला पाठीमागून जोरात धडक दिली. ही जीप कराड तहसील कार्यालयाची असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. या जीपमधील अभिजित आप्पासो रावते व मनोहर रामचंद्र चोपडे हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांनाही तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. हा ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा घटनास्थळी होती. यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने पुढे वळवली. महामार्ग वाहतूक पोलिस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. कळके, हवालदार सुनील पोळ, प्रवीण कोळी, रुपेश कारंडे, वैभव निकम, रायसिंग घोरपडे, अरुण निकम, राजेंद्र कुंभार, हायवे हेल्पलाईनचे दस्तगिर आगा, अमित पवार, जनता क्रेनचे अब्दुल सुतार, आजीम सुतार, सोहेल सुतार व श्री अॅब्युलन्सचे समीर केंजळे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.